द्वारका ते नाशिक रोड रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:11+5:302021-07-04T04:11:11+5:30
शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून या चौकात मुंबई - आग्रा रोड आणि नाशिक - पुणे या दोन महामार्गांचा संगम ...

द्वारका ते नाशिक रोड रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश
शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून या चौकात मुंबई - आग्रा रोड आणि नाशिक - पुणे या दोन महामार्गांचा संगम आहे. द्वारका येथून पुणेकडे जाणाऱ्या महामार्गावरून नाशिक रोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. शहरातील सर्वांत दाट वाहतुकीचा हा रस्ता आहे. परिणामी, द्वारका चौक ते दत्तमंदिर सिग्नल यादरम्यानचा वाहतुकीची सतत कोंडी होत असते. द्वारका चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत असल्याने मुंबई आणि आग्ऱ्याकडे नाशिक - पुणे महामार्गावरील जाणारी वाहतूकही सतत विस्कळीत होत असते. द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरूनगर परिसरातील वाहतुकीची कोंडी कायमची सुटावी, यासाठी द्वारका ते दत्तमंदिर चौकापर्यंत थेट उड्डाणपूल उभारण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. त्याला रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता देऊन सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यानच्या काळात द्वारका - दत्तमंदिर उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर अहवालदेखील तयार करण्यात आला होता. मात्र, सदर रस्ता हा महानगरपालिका हद्दीत येत असल्याने कामासाठी निधी कोण देणार, हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता. मनपाचे आर्थिक बजेट कमी असल्याने मनपाकडून या कामासाठी निधी मिळणे शक्य नव्हते. रस्ता मनपा हद्दीत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी हात वर केले होते. यातून मार्ग काढण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी दिल्ली दरबारी प्रयत्न केले. सदर सहा किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्गीकरण करून निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला असता, प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत द्वारका - दत्तमंदिर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्गीकरण करण्याची शिफारस रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे केली आहे.