मालेगावी लाच स्वीकारणाऱ्या दोघा पोलिसांना पकडले
By Admin | Updated: July 12, 2014 00:27 IST2014-07-11T22:33:53+5:302014-07-12T00:27:15+5:30
मालेगावी लाच स्वीकारणाऱ्या दोघा पोलिसांना पकडले

मालेगावी लाच स्वीकारणाऱ्या दोघा पोलिसांना पकडले
मालेगाव : तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून, त्यांच्या विरुद्ध रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार यांना व त्यांच्या पत्नीस सदर गुन्ह्यात अटक होऊन ते जामिनावर सुटले आहे. उर्वरित एका भावास अटक करून त्याला तुरुंगात न टाकता पोलीस कोठडी रिमांड न घेता लागलीच जामीन व्हावा यासाठी पोलीस नाईक मनोज मदन बाचकर यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचून पोलीस नाईक मनोज बाचकर यांना चार हजार रुपयांची लाच स्वीकारून पोलीस कर्मचारी नवनाथ त्र्यंबक आव्हाड याच्याकडे देताना रंगेहाथ पकडले. आव्हाड यांनी सदरची रक्कम स्वीकारून पळ काढला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यापूर्वीही तालुका पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना मनमाड चौफुलीजवळ लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्या घटनेपाठोपाठ पुन्हा दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना ताब्यात घेतल्याने परिसरात चर्चा सुरू आहे.