नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद
By Admin | Updated: December 5, 2015 23:55 IST2015-12-05T23:54:22+5:302015-12-05T23:55:59+5:30
नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद

नाशिकमध्ये पाणी प्रश्नावरून वाद
नाशिक : मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याने महापालिका आणि पालकमंत्री यांच्यातील वादाचे पडसाद उमटत आहेत. महापालिकेने डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घोषित झाल्यानंतरही अद्याप प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सदर पाणीकपात रद्द करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्याने प्रशासनही चिमटीत सापडले आहे. त्यामुळे आठवड्यातील एक वार निश्चित करण्यासही विलंब होत आहे.
गंगापूर व दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात करण्यात आल्याने महापालिकेने जुलै २०१६ अखेर उपलब्ध पाणीसाठा पुरेल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. महापौर अशोक मुर्तडक यांनी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, भाजपाने सदर निर्णयास विरोध दर्शवित एकवेळ पाणीकपातच पुढे चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी तातडीने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना महापालिकेला केली. तसे पत्रही लगोलग प्रशासनाला पाठविले. मात्र, महापौरांनी पालकमंत्र्यांनाच आव्हान देत वाढीव पाणीकपातीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. या साऱ्या वादात प्रशासन मात्र कोंडीत सापडले आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयाला सहा दिवस उलटून गेले तरी महापौरांकडून अद्याप पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणाऱ्या वाराची निश्चिती झालेली नाही. परिणामी, डिसेंबर महिन्यातील पहिला आठवडा तसाच गेला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेमुळे प्रशासनही अंमलबजावणीत वेळकाढूपणा करत असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांचा ठिय्या : हरणबारीतून पाणी सोडण्याची मागणी
नाशिक : हरणबारी धरण शंभर टक्के भरून ओव्हरप्फ्लो झाल्याने धरणातून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडण्यात येणारे नियमित आवर्तन पिण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी सोडण्यात यावे, या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी काल (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हरणबारीतून पहिले आवर्तन सोडण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले. मात्र धरण शंभर टक्के भरलेले असल्याने १५ डिसेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे सोडण्यात येणारे नियमित आवर्तन यावर्षीही सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार संजय चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली.