धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालकावर कुऱ्हाडीने वार
By Admin | Updated: March 14, 2017 21:28 IST2017-03-14T21:28:47+5:302017-03-14T21:28:47+5:30
रस्ता ओलांडणाऱ्या मुलाला ट्रकचा धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालकास जबर मारहाण करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना

धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालकावर कुऱ्हाडीने वार
नाशिक : रस्ता ओलांडणाऱ्या मुलाला ट्रकचा धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालकास जबर मारहाण करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना मंगळवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास गिरणारे परिसरात घडली़ यामध्ये ट्रकचालक सुनील काळू मोरे (३१, रा. बजरंगवाडी, ता. विल्होळी) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजेच्या सुमारास सुनील मोरे हे ट्रक (एमएच १५, बीजे ३१६३) घेऊन हरसूलकडे जात होते़ गिरणारे परिसरातून जात असताना रस्ता ओलांडत असलेल्या एका मुलास ट्रकचा धक्का लागला़ यामुळे तेथे उपस्थित असलेल्या अज्ञात इसमांनी मोरे यांच्याशी हुज्जत घालत मारहाण केली़ तर, यातील एकाने काही समजण्याच्या आत डोक्यात कुऱ्हाड मारली़
यामध्ये ट्रकचालक मोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी उपचारासाठी प्रथम गिरणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ दरम्यान, प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी गिरणारे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़