आवक घटल्याने फळभाज्या कडाडलेल्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:52 IST2017-08-05T00:51:49+5:302017-08-05T00:52:51+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिके नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे बाजारभाव तेजीत आल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत.

आवक घटल्याने फळभाज्या कडाडलेल्याच
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिके नाश पावल्याने आवक काही प्रमाणात घटली आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे बाजारभाव तेजीत आल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत.
बाजार समितीत वांगी, भोपळा, गिलके, दोडका, कारले, ढोबळी मिरची, टोमॅटो, या फळभाज्यांची आवक होत आहे. नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रुपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रुपये, दोडका ४० रुपये, भोपळा ३० रुपये नग, हिरवी वांगी ३५ रुपये, लाल वांगी ४० रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले. पावसाने सध्या उघडीप दिलेली असली तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. याशिवाय नाशिकच्या बाजार समितीतून गुजरातला शेतमाल निर्यात केला जात असून, गुजरात राज्यात या शेतमालाला व्यापाºयांकडून उठाव अधिक असल्याने बाजारभाव सध्या तेजीत आहेत. आगामी काही दिवसांत सर्वच फळभाज्या मोठ्या प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रति किलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८० रुपये प्रति किलो दराने खरेदी कराव्या लागत असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.