पावसामुळे प्रशासनालाही दिलासा
By Admin | Updated: July 5, 2016 00:27 IST2016-07-04T23:27:20+5:302016-07-05T00:27:23+5:30
पाणीचोरी : शेतकऱ्यांची गरज होणार पूर्ण

पावसामुळे प्रशासनालाही दिलासा
नाशिक : दारणातून चेहेडी बंधाऱ्यात सोडण्यात आलेल्या पाण्याची गळती व येवला, मनमाडसाठी सोडाव्या लागणाऱ्या पाण्याच्या संभाव्य चोरीमुळे संकटात सापडलेल्या प्रशासनाला दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे दिलासा मिळाला असून, पाण्याचा जोर असाच कायम राहिल्यास नदी, कालव्यांमधून पाण्याची चोरी आपोआपच रोखली जाणार असल्याचा दावा केला जात आहे.
दारणा धरणातून सिन्नर औद्योगिक वसाहत, सिन्नर शहर, एकलहरे प्रकल्प, नाशिक महापालिका व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी गेल्या महिन्यात पाणी सोडण्यात आले व ते चेहेडी बंधाऱ्यात अडविण्यात आले आहे. परंतु गेला महिनाभर पावसाने ओढ दिल्यामुळे या पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात असल्यामुळे प्रशासनाला बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त कराव्या लागल्या, तसेच पाणीचोरी प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी लागली. याउपरही पाणीचोरी रोखली जात नसल्याचे पाहून चेहेडी बंधाऱ्याच्या परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करावा लागला.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्णात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची गरज भागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरुणराजाचे आगमन कायम राहिल्यास धरणातून पिण्यासाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्याची चोरी होणार नाही, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यातही दोन दिवसांत दारणा धरणात झालेली कमालीची वाढ प्रशासनाला आणखीच सुखावह आहे.