निवडणुकीपेक्षा मतदान यंत्रे डोईजड
By Admin | Updated: March 25, 2015 01:35 IST2015-03-25T01:35:26+5:302015-03-25T01:35:26+5:30
निवडणुकीपेक्षा मतदान यंत्रे डोईजड

निवडणुकीपेक्षा मतदान यंत्रे डोईजड
देवळाली कॅम्प : निवडणुकीनंतर सहा महिने मतदान यंत्रे आहे त्याच स्थितीत ठेवावी लागतात असा नियम असल्याने छावणी परिषदेच्या ताब्यात असलेल्या यंत्रांच्या संरक्षणासाठी येणारा खर्च परिषदेला डोईजड झाला आहे. शिवाय एका वॉर्डाच्या निकालाबाबतचा पेचही न्यायालयात असल्याने या मशीन जवळच ठेवणे क्रमप्राप्त ठरले आहे.
छावणी परिषदेच्या आठ वॉर्डांच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून गेल्या ६ जानेवारी रोजी ५२ मतदान यंत्रे (इव्हीएम) छावणी परिषदेकडे देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४३ यंत्रे वापरण्यात आले. ११ जानेवारी रोजी मतदान व १२ जानेवारी २०१४ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. त्यानंतर मतदान यंत्रे ही छावणी परिषदेच्या कार्यालयातील उपाध्यक्षांच्या कक्षामध्ये ठेवण्यात आली आहेत. छावणी प्रशासनाकडून जिल्हा निवडणूक शाखेला मतदान यंत्रे घेऊन जाण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक नियमाकडे बोट दाखविल्याने छावणी प्रशासनाने दिल्लीच्या निवडणूक आयोग कार्यालयाकडून नियमावली मागवली होती. मात्र तेथूनही तेच उत्तर आले.निवडणूक झाल्यापासून मतदान यंत्रे बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाकडून २४ तास दोन बंदुकधारी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी दर दिवशी १७ हजार रुपयाची आकारणी करण्यात येणार असल्याचे पत्र पोलिसांनी छावणी परिषदेला दिलेले आहे. निवडणुकासाठी झालेल्या खर्चापेक्षा मतदान यंत्रे सांभाळण्याचा खर्च परिषदेला डोईजड झाला असून, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. (वार्ताहर)