पोलीस आयुक्तांच्या आदेशाला हरताळ
By Admin | Updated: July 3, 2016 23:40 IST2016-07-03T23:37:19+5:302016-07-03T23:40:57+5:30
कर्मचारी तेथेच : बदलीच्या ठिकाणी जाण्यास नाराजी

पोलीस आयुक्तांच्या आदेशाला हरताळ
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे साडेचारशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही बहुतांशी कर्मचारी आपल्या पूर्वीच्याच जागेवर असल्याचे चित्र आहे़ विशेष म्हणजे बदल्या रद्द करण्यासाठी वरिष्ठांमार्फत शिफारशी केल्या जात आहेत़, तर काहींच्या बाबतीत सोयीची बदली होऊनही अधिकारी सोडत नसल्याने द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे़ पोलीस आयुक्तांचे आदेश न मानता या कर्मचाऱ्यांनी सरळ आदेश धुडकावून लावल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे़
एका पोलीस ठाण्यात पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केली जाते़ या नियमानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांच्या विविध विभागांतील ४३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी ९ जून रोजी काढले़ तसेच या बदल्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या, मात्र बदल्या होऊनही बहुतांशी कर्मचारी पूर्वीच्याच जागेवर कार्यरत आहेत़
पोलीस निरीक्षक सोडत नसल्याचे कारण या कर्मचाऱ्यांकडून पुढे केले जाते आहे़, तर काही बदली झालेल्या ठिकाणी जाण्यास नाखूष असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे. (प्रतिनिधी)