उघड्या नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: December 4, 2015 22:09 IST2015-12-04T22:08:44+5:302015-12-04T22:09:50+5:30
मनपाचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये संताप

उघड्या नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात
सिडको : येथील उघडे नाले व गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असून, स्वच्छता नसल्याने नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सिडकोतील दत्तचौक, मोरवाडी, पंडितनगर, तोरणानगर, राजरत्ननगर, सिंहस्थनगर, त्रिमूर्तीचौक, खुटवडनगर यांसह सिडको भागातील नागरी वसाहतीत नैसर्गिक नाले असून, नाले हे नियमित साफ-सफाई केले जात नसल्याने व नाल्यांमध्ये परिसरातील नागरिक घाण व कचरा टाकतात, परंतु या नाल्यांची कधीही स्वच्छता होत नसल्याने त्यात कचऱ्याचे ढीगच तयार झाले आहे. महापालिकेने हे उघडे नाले कायम साफसफाई करणे गरजेचे आहे; परंतु त्याबाबत मनपा गांभीर्याने लक्ष देत नाही.
नागरीवस्ती झपाट्याने वाढल्याने उघडे नाले हे नागरिकांच्या अगदी घरालगतच दिसत आहे. काही नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर एकदाच स्वच्छता केली जाते. त्यांनतर या नाल्याकडे दुर्लक्ष केले जाते. सिडको भागात गेल्या काही महिन्यांमध्ये डेंग्यूसदृश आजार होऊन रुग्ण दगावल्याच्या घटना घडलेल्या असतानाही मनपा मात्र गांभीर्याने पहात नाही.
सिडको ही दाट लोकसंख्या असलेला भाग असल्याने याठिकाणी आरोग्याचा प्रश्न कायम भेडसावतो. या उघड्या नाल्यामध्ये घाणीमुळे दुर्गंधी पसरते. मनपाने सदर उघडे नाले बंदिस्त करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या उघड्या नाल्याबरोबरच काही भागांत उघड्या गटारीदेखील असून, याबाबतही मनपाने दखल घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)