नाशिक : बेरोजगारीचा दर कमी करून अकुशल कामगारांना रोजगार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेत पावसाळ्यात मजुरांची संख्या कमी होत असल्याचा अनुभव असला तरी यंदा पावसाने दडी मारल्याने रोजगार हमीवरील मजुरांची संख्या कायम असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सद्य:स्थितीत रोजगार हमीवर ११ हजार ९३८ मजूर कामावर आहेत.
ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना वर्षातून किमान शंभर दिवस रोजगार देण्याच्या रोजगार हमीवर ग्रामीण भागातील अर्थचक्र अवलंबून आहे आदिवासी, दुर्गम भागातील मजुरांना या योजनेचा वर्षभर लाभ होत असतो. शेतीची कामे संपली की शेतमजुरांना कामे नसल्याने असे मजूर रोजगार हमीच्या कामावर रुजू होतात. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी १० ते ११ हजार मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत असतो.
जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांची संख्यादेखील मोठी आहे. पावसाळा सुरू झाल्यांनतर मजूर शेतीच्या कामावर निघून जातात. त्यामुळे रोजगार हमीवरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते; परंतु यंदा जुलैमध्येही रोजगार हमीवरील मजुरांची संख्या कायम असल्याने पावसाने ओढ दिल्याचा हा परिणाम मानला जात आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या १७६३ कामांवर ८३४१ मजूर काम करीत असून, यंत्रणा स्तरावर ७४१ कामांवर ३५९७ मजूर काम करीत आहेत. ग्रामंपचायत स्तरावर रस्ता खडीकरण, वृक्ष लागवड, विहीर, पोल्ट्री शेड, कॅटर शेड, गोट शेड, घरकुल, शालेय क्रीडांगण, विहीर पुनर्भरण, दगडी बांध आदी विविध प्रकारची कामे केली जातात. त्याचप्रमाणे इतर यंत्रणांकडील रोपवाटिका, वृक्षलागवड, फळबाग लागवड आदी कामे सुरू आहेत.
या कामांच्या माध्यमातून सुमारे दोन हजार मजूर विविध तालुक्यांमध्ये काम करीत आहेत. सुरगाणा आणि दिंडोरी या दोन तालुक्यांमध्ये मजुरांची संख्या कमी आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने येथील शेतीची कामे सुरू झालेली आहेत. इतर तालुक्यांमध्ये शेतीची अपेक्षित कामे सुरू नसल्याने अशा तालुक्यांमध्ये रोजगार हमीवरील कर्मचाऱ्यांची संख्या नेहमीप्रमाणेच असल्याचे दिसते.
कोरोनाच्या काळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्ह्यात मात्र रोजगार हमीवरील कामे सुरू होती. या कामांवरील मजुरांची संख्यादेखील वाढली होती. गेल्या दोन वर्षांपासून रोजगार हमीवरील रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या कायम आहे. पावसाने ओढ दिल्यानेदेखील मजूर संख्या कायम असल्याचे दिसते.
--इन्फो--
जिल्ह्यात अडीच हजार कामे
ग्रामपंचायत, तसेच यंत्रणा स्तरावर जिल्ह्यात १५०४ कामे सुरू आहेत. या कामांवर एकूण मजुरांची संख्या ११९३८ आहे. जू्न महिना कोरडा गेला आहे, तर जुलैमध्येही शेतीची कामे थांबल्याने मजूर रोजगार हमीवर काम करू लागले आहेत. दुबार पेरणीचेदेखील संकट निर्माण झाल्याने अशी परिस्थिती उद्भवल्यास मजूर पुन्हा शेतीच्या कामावर परततील. गेल्या महिनाभरापासून मात्र रोजगार हमीवरील मजुरांची संख्या कायम आहे.