जिल्हा रुग्णालय रुग्णांअभावी ओस

By Admin | Updated: July 7, 2014 00:52 IST2014-07-07T00:44:53+5:302014-07-07T00:52:07+5:30

जिल्हा रुग्णालय रुग्णांअभावी ओस

Due to lack of District Hospital patients | जिल्हा रुग्णालय रुग्णांअभावी ओस

जिल्हा रुग्णालय रुग्णांअभावी ओस

 

विजय मोरे

नाशिक
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांवर योग्य वैद्यकीय उपचार होत नसल्याने जिल्हा रुग्णालयातील ९० टक्के रुग्ण खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जात असून, केवळ १० टक्केच रुग्ण उपचारासाठी थांबून आहेत़ जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक विभागात रिकामे बेड्स दिसून येत असून, रुग्णांची केविलवाणी स्थिती आहे़ जिल्हा रुग्णालयाबाहेर बेमुदत संपास बसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासदारांसह विविध राजकीय नेत्यांनी रविवारी भेट घेऊन पाठिंबा दिला़ दरम्यान, मेस्मा कायद्यान्वये केली जाणारी कारवाई मागे न घेतल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा मॅग्मो संघटनेतर्फे देण्यात आला आहे़
विविध मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो संघटनेने १ जुलैपासून बेमुदत असहकार आंदोलन सुरू केले आहे़ राज्यातील सुमारे १२ हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून, नाशिक जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र यांमधील रुग्णसेवा कोलमडली आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालय तर रुग्णांअभावी ओस पडले आहे़ रुग्णालयात केवळ १० टक्के रुग्ण शिल्लक असून ओपीडीही कमी झाली आहे़
या संपामध्ये सहभागी होणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शासनाने मेस्माद्वारे कारवाई करण्याचे, तसेच २४ तासांत हजर होण्याचे आदेशही दिले होते़ मात्र संघटनेने शासनाच्या या कारवाईला न जुमानता आपला हेका कायम ठेवला आहे़ जिल्हा रुग्णालयाबाहेर बसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रविवारी नेत्रदानाचे अर्ज भरून जिल्हा नेत्रपेढीकडे सोपवून भविष्यात देहदानाचा संकल्प सोडला़ या वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक विनायक पांडे, अजय बोरस्ते आदिंसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला़ दरम्यान, मॅग्मो संघटनेने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात शासनाने संपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील मेस्माची कारवाई मागे न घेतल्यास राज्यभर जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Due to lack of District Hospital patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.