योग्य आहाराद्वारे वाढत्या उन्हावर करा मात
By Admin | Updated: April 1, 2017 01:00 IST2017-04-01T00:59:49+5:302017-04-01T01:00:13+5:30
नाशिक : सलग चार दिवसांपासून वाढते तपमान, आग ओकणारे ऊन, उकाडा यामुळे नाशिककर हैराण झाले असून, आरोग्याच्या विविध समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.

योग्य आहाराद्वारे वाढत्या उन्हावर करा मात
नाशिक : सलग चार दिवसांपासून वाढते तपमान, आग ओकणारे ऊन, उकाडा यामुळे नाशिककर हैराण झाले असून, आरोग्याच्या विविध समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच संसर्गजन्य आजारांचेही प्रमाण वाढत चालले असल्याने योग्य आहाराद्वारे वाढत्या तपमानाला सामोरे जावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. कृत्रिम व आरोग्यास हानीकारक पेयांऐवजी नैसर्गिक पेयांवर भर द्यावा, असा सूरही त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाला आहे. (प्रतिनिधी)
वाढत्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या दिवसात भरपूर पाणी प्यावे. दही, ताक, पंजिरी यांचा आहारात समावेश करावा. फ्रीजमधील पाणी, बर्फ, कोल्ड्रिंक्स याऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचे सरबत, तुकुमराईची खीर अशा नैसर्गिक पेयांचे प्रमाण वाढवावे. उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. पूर्वापार चालत आलेला गूळपाणी हा तर सर्वोत्तम पर्याय आहे. चहा, कॉफी या दिवसात बंद करावी. दूध, दही, ताक, सोलकढी यांचा वापर वाढवावा. फ्लू सारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले खडीसाखर, धणे, बडिशोप यांचे पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. याशिवाय रात्री झोपताना डोळ्यावर गुलाब पाण्यात बुडवलेले कापसाचे बोळे ठेवावेत.
- प्रा. वैशाली चौधरी, आहारतज्ज्ञ, एसएमआरके महाविद्यालय
सध्या वाढत्या उन्हामुळे उष्माघाताची शक्यता वाढली आहे. आपले शरीर जेव्हा वाढते तपमान सहन करू शकत नाही तेव्हा ते निरनिराळ्या लक्षणांनी ते व्यक्त करत असतात. योग्य आहार घेऊन स्वत:ला फिट ठेवावे. घरातील सर्व सदस्यांनी कलिंगड, द्राक्ष, लिंबू, काकडी, आवळा, कोरफड यांचे काळे मीठ, जिरे पावडर टाकून केलेले ज्यूस प्यावे. हिरवी मिरची टाळून पाणीपुरीचे पाणी बनवून ते दिवसातून ४ ते ५ ग्लास प्यावे. १ चमचा खसखस पावडर व अर्धा चमचा गूळ हे मिश्रण लिंबूपाण्यात टाकून त्याचे प्राशन करावे. कोथंबिर, जिरे, बडिशोप हे काहीकाळ पाण्यात भिजवून ते पाणी दिवसातून २ ते ३ ग्लास प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतील. प्रत्येकाने कलिंगड, काकडी आदिंचे सेवन करावे. लिंबू पाण्यात चमचाभर तुकुमराई टाकून ते प्यावे. दररोज नियमितपणे ताक प्यावे. दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याचा प्रयत्न करावा. झोपण्यापूर्वी आवर्जून हातपाय धुवावेत. चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून ती पेस्ट कपाळावर, छातीवर व कानाच्या पाळ्यांवर लावावी.
- रश्मी सोमाणी, आहारतज्ज्ञ
सध्या खूप ऊन वाढले आहे. प्रत्येकाने दररोज कमीत कमी ५ ते ६ लिटर पाणी प्यावे. या दिवसात आंबट फळांचा वापर वाढवावा. तळलेले, अतिगोड, खूप तिखट पदार्थ अजिबात खाऊ नये. हलका आहार घ्यावा. ताक, कैरीचे पन्हे, लस्सी, उसाचा रस, नारळपाणी, कोकम सरबत, लिंबूपाणी, उसाचा रस अशी पेये आवर्जून घ्यावीत. कोल्ड्रिंक, फ्रीजमधले पाणी हे जरी क्षणभर थंडावा देत असले तरी नंतर ते शरीरात उष्ण पडतात. त्यामुळे ते टाळावे. एकदम पोटभर न जेवता थोड्या थोड्या वेळाने खावे हलका आहार घ्यावा. जेवणात कच्चा कांदा, कैरी, टोमॅटोच्या चकत्या, काकडी अशा सॅलडसचा वापर वाढवावा. या साऱ्यांमुळे उन्हाळा सुकर होऊ शकतो.- रंजिता शर्मा, आहारतज्ज्ञ, संदर्भ सेवा रुग्णालय