अवजड वाहनातील राखेमुळे नायगाव खोऱ्यातील वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:46 IST2019-06-10T18:45:46+5:302019-06-10T18:46:26+5:30
नायगाव: सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वच रस्त्यांवरून चालणाºया अवजड वाहतूकीच्या समस्येबरोबर अवजड वाहनातून उडणा-या राखेमुळे वाहन चालक व प्रवासी हैराण झाले आहे. अवजड वाहतूकीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अवजड वाहनातील राखेमुळे नायगाव खोऱ्यातील वाहनचालक त्रस्त
तालुक्याच्या उत्तर भागातील जायगाव, नायगाव, देशवंडी, ब्राम्हणवाडे, सोनिगरी, जोगलटेंभी, सोनगिरी आदी सर्वच रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूकीचे विशेषत: अवजड वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. या वाहतूकीत नाशिक तालुक्यातील एकलहरे येथील वीज निर्मिती केंद्रातून निघणाºया राखेची वाहतूक करणाºया वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील अनेक वाहने नायगाव रस्त्यावरून ये-जा करतात. राख वाहणारे वाहने व्यवस्थित झाकले जात नसल्यामुळे वाहनातून उडणारी राख रस्त्याने ये-जा करणा-या वाहन चालकांची व प्रामुख्याने दुचाकी चालकाला डोकेदुखी ठरत आहे. परिसरातील ब्राम्हणवाडे - जायगाव व नायगाव - सिन्नर या रस्त्याने सर्रास ही वाहतूक सुरू असते. राख वाहनारे वाहन व्यवस्थित झाकले जात नसल्याने वा-याच्या झुळकेने ही राख उडत वाहन चालकांबरोबर प्रवाशांच्या डोळ्यात उडून छोटे -मोठे अपघाताला आमंत्रण देत असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. उडणारी राख व धुळीमुळे सिन्नर - सायखेडा व शिंदे - बारागावपिंप्री या दोन्ही रस्त्याने प्रवास करणे डोकेदुखी ठरत आहे.