शासकीय पावसाळा संपुष्टात
By Admin | Updated: October 14, 2015 23:40 IST2015-10-14T23:39:33+5:302015-10-14T23:40:08+5:30
यंदा १५ आॅक्टोबरपर्यंत मोजणी : नांदगावला फक्त ३२ टक्के पाऊस

शासकीय पावसाळा संपुष्टात
नाशिक : दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंतच मोजला जाणारा व शासकीय दप्तरात नोंदविला जाणारा पाऊस यंदा १५ आॅक्टोबरपर्यंत मोजण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्णात जवळपास १५ टक्के पाऊस कमीच झाला आहे. एकटा नाशिक तालुकावगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण संपूर्ण हंगामात सरासरी ६४ टक्के इतकेच राहिले आहे, त्यामुळे रब्बीला फायदा होण्याची व्यक्त होणारी अपेक्षा आता सारी अवकाळी पावसावरच अवलंबून आहे.
दरवर्षी पाऊस कधीही सुरू झाला तरी, शासनाच्या दप्तरात तो १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीतच मोजला जातो. दर महिन्याची पावसाची सरासरी व पडणारा पाऊस याची तुलना करून त्यावरून पावसाचा अंदाज बांधण्याचे व त्या आधारेच पुढील उपाययोजना करण्याची पूर्वापार शासकीय पद्धत आजवर चालत आली आहे. यंदाही पावसाळ्याचे शासकीय दप्तर याचप्रमाणे नोंदविण्यात आले, परंतु ३० सप्टेंबर नंतरही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे तसाही यंदा पाऊस कमीच झाल्याने शासनाने १५ आॅक्टोबरपर्यंत पाऊस मोजण्याच्या सूचना शासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाची सरासरी अधिक असते; मात्र आॅक्टोबरमध्ये त्याची सरासरी अगदीच अल्प असली तरी, गेल्या पंधरा दिवसात मोजला गेलेला पाऊस आॅक्टोबरच्या सरासरीच्या निम्माच पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णात ७९ टक्के पाऊस झाला, त्या तुलनेत यंदा फक्त ६४ टक्केच पाऊस झाला आहे.
नाशिक तालुक्यात १०३ टक्के पाऊस झाल्याची नोंद असून, सर्वात कमी ३२ टक्के पाऊस नांदगाव तालुक्यात झाला आहे.