अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अवस्था बिकट
By Admin | Updated: August 9, 2016 00:57 IST2016-08-09T00:57:29+5:302016-08-09T00:57:46+5:30
विजयश्री चुंभळेंकडून पाहणी : जातेगाव, तळेगावला नुकसान

अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अवस्था बिकट
नाशिक : तालुक्यातील मौजे जातेगाव, तळेगाव येथे अतिवृष्टीमुळे रस्ते व मोऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी केली. यावेळी तळेगाव ते बेळगाव ढगा रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्याच्या सूचना चुंभळे यांनी बांधकाम विभागाला दिल्या.
नाशिक तालुक्यातील जातेगाव, तळेगाव, तिरडशेत येथे अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची व मोऱ्यांची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात रस्ते खचल्याचे तसेच मोऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांना आढळून आले. तसेच भागातील जास्त प्रमाणात खचलेले रस्ते व पूल यांच्यावरून रहदारी बंद करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यात मौजे तळेगाव ते बेळगाव ढगा हा रस्ता मोठ्या प्रमाणात पुराखाली गेल्याने व पुढील काही दिवस अतिपर्जन्यमानाचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्याच्या सूचना अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी दिल्या. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.
याप्रसंगी त्यांच्या दौऱ्यात कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, उपअभियंता संजय पवार, शाखा अभियंता मधुकर लांबे, सरपंच सुशीला भावले, भागुजी बोकड, सुकदेव भावले, निवृत्ती सदगीर, निवृत्ती दाते, दशरथ कांडेकर, विलास पगार, शरद पगार
आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)