सण बाजारावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 23:27 IST2016-04-07T23:02:01+5:302016-04-07T23:27:48+5:30
वडनेर : आठवडे बाजारात शुकशुकाट; काम नसल्याने मजुरांची उपासमार

सण बाजारावर दुष्काळाचे सावट
वडनेर : येथील आठवडे बाजारात शुकशुकाट दिसून आला. शुक्रवारी गुढीपाडवा असल्याने मंगळवारी असलेला बाजार हा सणबाजार होता; परंतु सणबाजार असूनही वडनेर बाजारात गर्दी दिसून आली नाही. वडनेर ही मालेगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ आहे. बाजार व दळणवळणासाठी सुमारे ४२ खेड्यांचा संपर्क वडनेरशी येतो. त्यामुळे वडनेरात भरणारा आठवडे बाजाराला विशेष महत्त्व आहे.
वडनेरसह काटवन परिसरात सातत्याने वाढलेल्या दुष्काळामुळे विहिरी कोरड्याठाक झाल्या. परिणामी परिसरात प्रमुख पीक असलेले कांदा लागवडी कमी झाली. त्यामुळ परिसरात मोठ्या प्रमाणात असलेला मजूरवर्ग ऐन सणासुदीच्या दिवसात मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचाच परिणाम वडनेरात भरणाऱ्या आठवडे बाजारावर दिसून आला आहे.
एरवी ग्राहकांच्या गर्दीने फुलणारा बाजार दिवसेंदिवस ओस पडताना दिसत आहे. काटवन परिसरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या वडनेर बाजारात मोठ्या प्रमाणात किराणा व्यवसायिक, भाजीपाला व जीवनोपयोगी साहित्याची विक्री होत असते. मंगळवारी सणबाजारावर दुष्काळाचे सावट दिसून आले.