चास येथे विहिरीत पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: January 19, 2016 22:58 IST2016-01-19T22:33:44+5:302016-01-19T22:58:30+5:30
चास येथे विहिरीत पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

चास येथे विहिरीत पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
नांदूरशिंगोटे : शाळा सुटल्यानंतर सायकलीने घरी जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडल्याने चास येथे सहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. या घटनेमुळे चास परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नीलेश गणपत उघडे (१२) हा चास येथील भोजापूर खोरे हायस्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. काळशेतवाडी येथील वस्तीवरून तो सायकलने शाळेत ये-जा करीत असे. नेहमीप्रमाणे सोमवारी शाळा सुटल्यानंतर तो सायकलने घराकडे परत जात असताना गावाजवळील बालाजी मंदिरासमोरील यादव खैरनार यांच्या विहिरीत तो पडला. सायंकाळ झाली तरी नीलेश घरी आला नाही म्हणून उघडे कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांकडे चौकशी केली असता तो शाळा सुटल्यानंतर सायकलने घराकडे परत गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रस्त्याने व परिसरात त्याचा शोध घेण्यास प्रारंभ करण्यात आला. काळशेतवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेने त्याचा शोध सुरू असताना विहिरीत डोकावल्यानंतर संशय आला. विहिरीला केवळ तीन फूट पाणी होते. त्यात त्याची सायकल दिसून आली. त्यानंतर हरिभाऊ मेंगाळ या ग्रामस्थाने रात्रीच्या अंधारात विहिरीत उतरून शोध घेतला असता नीलेशचा मृतदेह आढळून आला. मुख्याध्यापक डी.टी. भाबड यांनी नांदूर पोलीस दूरक्षेत्रात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोडी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर काळशेतवाडी येथे शोकाकुल वातावरणात नीलेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)