याद्यांमधील गोंधळामुळे मतदारांची पायपीट
By Admin | Updated: February 22, 2017 01:27 IST2017-02-22T01:27:41+5:302017-02-22T01:27:56+5:30
पश्चिम विभाग : पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची गैरसोय

याद्यांमधील गोंधळामुळे मतदारांची पायपीट
नाशिक : महापालिकेच्या पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, १२ व २४ मध्ये मतदारांनी सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात केली. परंतु अनेक मतदान याद्यांमधील घोळांमुळे मतदारांना एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या मतदान केंद्रावर पाटपीट करावी लागली. शिवाय निवडणूक आयोगाने केलेली मतदान केंद्रांची रचनाही मतदारांसाठी डोकेदुखी ठरल्याचे दिसून आले.
मतदान केंद्रावरील बूथ कर्मचाऱ्यांनाही मतदारांना त्यांचे नाव यादीत शोधून देण्यासाठी अडचणी येत असल्याने अनेक मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. तर काही मतदारांच्या हातात मतदार ओळखपत्र असताना यादीत नाव नाही म्हणून मतदान न करता परतावे लागल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. महापालिके त चांगला नगरसेवक निवडून देण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. परंतु मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्र ारी मतदान केंद्रांवर करण्यात आल्या.
मतदारांना त्यांच्या निवासापासून दूर अंतरावर मतदान केंद्रावर मतदानाला जाण्यासाठी पायपीट करावी लागत असतानाही मतदान केंद्रावर उमेदवारांना यादीत नाव मिळाले नाही. नाव मिळाले तर दक्षिण इमारत, उत्तर दरवाजा अशा दिशांच्या गोंधळात नागरिकांना पायपीट करावी लागली. बूथ कर्मचाऱ्यांनाही इमारतीच्या दिशा माहीत नसल्याने त्यांनाही मतदारांना योग्य मार्गदर्शन करता आले नाही. मतदान केंद्र हे मतदाराच्या निवासापासून दोन कि.मी.च्या परिघात असावे, असा नियम असताना असंख्य मतदारांना दूर अंतरावर मतदान केंद्रावर मतदानासाठी जावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या बाबतीत त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. परंतु सुरक्षा यंत्रणेने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना थेट मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत केली. दरम्यान, अनेक मतदारांना चिठ्ठ्या अनेकांना प्राप्त झाल्या नसल्याने त्यांना मतदान केंद्रावर आपल्या नावाची शोधाशोध करावी लागली. परंतु अशी नावे शोधताना बूथ कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सुशिक्षित नागरिकांनी स्वत:च मतदार याद्यांमधील नावे शोधून मतदानाचा हक्क बजावला. (प्रतिनिधी)