रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:20 IST2018-09-26T00:19:48+5:302018-09-26T00:20:14+5:30
देवळालीगावात सोमवारचा बाजार हा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चालला असून, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक गोंगाट, कचरा, दुर्गंधी यामुळे हैराण झाले आहेत. या बाजाराला संबंधितानी शिस्त लावावी व परिसरातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी
नाशिकरोड : देवळालीगावात सोमवारचा बाजार हा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चालला असून, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक गोंगाट, कचरा, दुर्गंधी यामुळे हैराण झाले आहेत. या बाजाराला संबंधितानी शिस्त लावावी व परिसरातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. देवळालीगाव महात्मा गांधी पुतळा व गाडेकर मळ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजार पसरत चालला आहे. वाजवी किमतीत व ताजा शेतीमाल मिळत असल्याने आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी विक्रेत्यांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे. देवळालीगाव सोमवार पेठ येथील मोकळ्या जागेत गेल्या कित्येक वर्षांपासून सोमवारचा आठवडे बाजार भरतो. नाशिकरोडच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आपला शेतीमाल, किराणा दुकानदार व विविध वस्तू विक्रेते आठवडे बाजारात दुकान थाटत होते. सुविधांचा अभाव, वर्गणीचा त्रास, दादागिरी आदी कारणांमुळे त्रस्त झालेले विक्रेते आठवडे बाजाराच्या मूळ जागेवर बसण्यापेक्षा आठवडे बाजाराकडे देवळालीगावातून येणाऱ्या रस्त्यावर बसू लागले. त्यामुळे आठवडे बाजाराच्या मूळ जागेवर बसणाºया विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. अनेकजण रस्त्यावरच दुकाने थाटून बसत आहेत. मनमाड-इगतपुरी शटल रेल्वेमुळे शेतकरी भाजी व इतर वस्तू विक्रेते दुपारी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजारात येतात व व्यवसाय करून सायंकाळी पुन्हा शटलने रवाना होतात. आठवडे बाजारात अत्यंत कमी किमतीत ताजा शेतीमाल, अन्नधान्य व इतर विविध वस्तू मिळत असल्याने ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देवळालीगाव, विहितगाव, राजवाडा, सुभाषरोड, रोकडोबावाडी, जयभवानीरोड, आर्टिलरी सेंटररोड, आनंदनगर, जगताप मळा आदी भागातून रहिवासी, महिला खूप मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात.
आठवडे बाजाराच्या कक्षा वाढत चालल्या आहेत. सायंकाळी ७ वाजता शटल रेल्वे येत असल्याने अनेक विक्रेते निघून जातात. मात्र स्थानिक विक्रेते उशिरापर्यंत असतात. रात्री रस्त्यावर भाजीपाला व केरकचरा साठतो. मंगळवारी सकाळी रस्त्यावरील भाजीपाला, केरकचरा उचलण्याची पाळी मनपा कर्मचाºयांवर येते.
लाखोंची आर्थिक उलाढाल
आठवडे बाजारात रास्त भावात ताजा शेतीमाल, धान्य व इतर गरजेच्या वस्तू मिळत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीकरिता येतात. यामुळे दर सोमवारी आठवडे बाजारात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. आठवडे बाजारातील विक्रेत्यांनी मूळ जागा सोडून रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटत असल्याने वाहतुकीची कोंडी व तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. आरडाओरड, केरकचरा, दुर्गंधी यामुळे रहिवासी वैतागले आहेत. मात्र बाजारात चहूबाजूने ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने हनुमानाच्या शेपटीप्रमाणे बाजार लांबत चालला आहे.