व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजारभावात घट
By Admin | Updated: July 10, 2016 01:07 IST2016-07-10T00:24:38+5:302016-07-10T01:07:15+5:30
आडत प्रकरण : शेतकऱ्यांची कोंडी

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजारभावात घट
पंचवटी : शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, असे आदेश शासनाने बाजार समित्यांना दिल्याने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शनिवारपासून लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे अवघा दहा टक्केमाल दाखल झाला आणि भावही मोठ्या प्रमाणात कोसळले.
शनिवार सकाळी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल किरकोळ व्यापारी व चवळी दलालांनी खरेदी केला, मात्र बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने शेतकरी हिताचा निर्णय म्हणून शेतकऱ्यांऐवजी यापुढे शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी, असे स्पष्ट केल्याने व्यापारीवर्गाने एकजूट करत शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी लिलावात सहभागी न होण्याचे ठरवून बेमुदत बंदची हाक दिली आहे. शनिवारी सकाळी शेतकऱ्यांनी शेतमाल आणला खरा, मात्र शुक्र वारी मिळालेल्या बाजारभावापेक्षा निम्म्या दराने किरकोळ व्यापारी व भरेकऱ्यांनी (चवळी दलाल) शेतमाल खरेदी केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. बाजार समितीत ढोबळी मिरची, काकडी, हिरवी मिरची, वांगे, कोबी, फ्लॉवर अशा फळभाज्या विक्र ीसाठी आल्या होत्या, मात्र फळभाज्यांची केवळ १० ते १५ टक्के आवक आलेली होती. आडत प्रकरणामुळे व्यापारीवर्गाने शेतमाल खरेदी न केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. एरवी शेतमालाने भरगच्च होणारी बाजार समिती शनिवारी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे ओस पडलेली होती. (वार्ताहर)