बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे चारचाकीची आग आटोक्यात
By Admin | Updated: March 22, 2015 23:54 IST2015-03-22T23:54:01+5:302015-03-22T23:54:15+5:30
मुरारीनगरमधील घटना : मोठा अनर्थ टळला

बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे चारचाकीची आग आटोक्यात
सिडको : सोसायटीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या चारचाकीला अज्ञात समाजकंटकांनी लावलेली आग पोलीस बिट मार्शलच्या सतर्कतेमुळे तत्काळ लक्षात आली़ स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला़ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिडकोतील मुरारीनगरमध्ये ही घटना घडली़
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको परिसरातील मुरारीनगरमध्ये असलेल्या गजानन पार्क या सोसायटीत नितीन सोनवणे राहतात़ शनिवारी (दि़२१) नेहमीप्रमाणे त्यांनी आपली सॅन्ट्रो कार (एमएच १५, बीएक्स १२८८) सोसायटीच्या वाहनतळात लावलेली होती़ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या कारला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला़ अंबड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल मोहन संगमनेरे हे या परिसरात गस्त घालीत असताना त्यांना सोसायटीच्या आवारातील कारला आग लागल्याचे दिसले़
यानंतर संगमनेरे यांनी त्वरित सोसायटीतील रहिवाशांना उठवून या गाडीवर पाणी टाकून आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला़ दरम्यान, या घटनेची माहिती कळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध लावला़ सिन्नर तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी संशयित बाळू चंद्रमोरे याने अंतर्गत वादातून हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)