अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे ‘हटेना’ अंधार
By Admin | Updated: November 19, 2015 23:56 IST2015-11-19T23:55:36+5:302015-11-19T23:56:10+5:30
सौर पथदीप खरेदी : ग्रामपंचायतींना प्रतीक्षा कायम

अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे ‘हटेना’ अंधार
नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची तीन कोटींच्या सौर पथदीप खरेदीचा मार्ग मोकळा झालेला असतानाच अचानक कृषी विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामीण भागातील सौर पथदीपांमुळे पडणारा उजेड पडत नसल्याने ‘अंधार’ लोटल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मंगळवारी नियमानुसार संबंधित कंपनीस कृषी विभागाच्या सौर ऊर्जा विभागामार्फत सौर पथदीप पुरविण्याचे आदेश निघण्याची शक्यता होती. मात्र काल (दि. १९) पर्यंत हे आदेश निघालेच नाहीत.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हेमंत काळे हे शासनाच्या वतीने तुर्भे (मुंबई) येथे प्रशिक्षणास गेले आहेत. तर सौरऊर्जा अधिकारी विजय उगले हे खासगी कारणास्तव अचानक आठवडाभर रजेवर गेले आहेत. त्यामुळे सौर पथदीप खरेदीचे आदेश संबंधित कंपनीला देण्यासाठी वरिष्ठ अधिकारीच उपस्थित नसल्याचे चित्र होते. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्णातील सुमारे तीनशे ग्रामपंचायतींना १० टक्के लोकवर्गणीच्या अटीवर सौर पथदीप पुरविण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला सुमारे तीन कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही सौर पथदीप खरेदी या ना त्या कारणामुळे रखडल्याचे चित्र होते. पहिल्यांदा राजस्थान येथील एका कंपनीस सौर पथदीप पुरविण्याचा ठेका देण्यात आल्यानंतर या कंपनीने वेळेत पुरवठा न केल्याने त्या कंपनीचा ठेका रद्द करण्यात येऊन दुसऱ्यांदा ई-निविदा पद्धतीने सौर पथदीपांसाठी कार्यवाही करण्यात आली होती. (प्रतिनिधी)