सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथील जनता विद्यालयाचे विज्ञानशिक्षक पी. आर. करपे यांनी ४१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या आधुनिक आवर्तसारणी या शैक्षणिक साहित्यास माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती किरण थोरे, सभापती उषा बच्छाव, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, विज्ञान संघाचे अध्यक्ष सी. बी. पवार, एस. बी. शिरसाट, डी. व्ही. अहिरे, राजेश सावंत यांच्या हस्ते करपे यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. वर्गातील विद्यार्थी प्रत्येक मूलद्रव्याची माहिती स्वतंत्रपर्ण हसतखेळत संकलित करू शकतो. याबरोबरच करपे यांनी विविध प्रकारची संयुगे आणि रेणुसूत्रे यांच्या फिल्म तयार केल्या असून, त्यावरून रासायनिक अभिक्रिया संतुलित करण्यास मदत होणार आहे. विशेषत: दहावीसाठी कठीण वाटणारा भाग कार्बन आणि हायड्रोजन यांची संयुगे तयार करण्यासाठी विद्यार्थी हाताळतील असे मॉडेल करपे यांनी तयार केले आहे. ज्ञानरचनावादावरच सदर शैक्षणिक साहित्य आधारित असून, गमतीतूनच हायड्रोकार्बनची संयुगे सहज तयार करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यशाबद्दल मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, संचालक कृष्णाजी भगत, मविप्रचे शिक्षणाधिकारी एस. के. शिंदे, शालेय समिती अध्यक्ष रघुनाथ वारुंगसे, नारायण वाजे, प्राचार्य एस. सी. रहाटळ, पर्यवेक्षक आर. डी. वाजे, ई. ए. खैरनार, बी. व्ही. कडलग यांनी करपे यांचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)
डुबेरेचे साहित्य द्वितीय
By admin | Updated: January 20, 2016 22:40 IST