एकात्मतेसाठी दुआ; आतंकवादाचा निषेध

By Admin | Updated: July 8, 2016 01:04 IST2016-07-08T01:03:30+5:302016-07-08T01:04:21+5:30

इदगाह : रिमझिम पावसात ईदचे उत्साहात नमाजपठण

Dua for integration; Terrorism Protest | एकात्मतेसाठी दुआ; आतंकवादाचा निषेध

एकात्मतेसाठी दुआ; आतंकवादाचा निषेध

नाशिक : दहशतवादी संघटना पोसणारा इस्त्राइल मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, इस्लाम जिंदाबाद, भारत जिंदाबाद...भारत की एकता हमेशा रहेगी बरकरार, अशा घोषणा देत शेकडो मुस्लीम नाशिककरांनी शहाजहांनी इदगाहवरून अवघ्या देशाला नव्हे, तर जगाला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. वरुणराजाच्या साक्षीने रमजान ईदचा दिमाखदार पारंपरिक सोहळा संपन्न झाला.
रमजान पर्वचे तीस उपवास (रोजे) पूर्ण करत मुस्लीम बांधवांनी गुरुवारी (दि.७) सकाळी १० वाजता रिमझिम पावसात ईदचे विशेष नमाजपठण सामुदायिकरीत्या केले. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये नमाजपठणाचा सोहळा यशस्वीरीत्या शांततेत संपन्न झाला. या वर्षीच्या नमाजपठण सोहळ्याचे आगळे वैशिष्ट्य होते ते म्हणजे प्रारंभी व समारोपादरम्यान शेकडो नागरिकांनी सुरुवातीलाच आतंकवादाचा निषेध नोंदविला तसेच भारतीय एकता व अखंडतेचा विश्वास अधिक दृढ केला.
प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे शहर असलेल्या मदिनामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेची सौदी सरकारने सखोल चौकशी करत सत्त्य जगापुढे मांडावे, यासाठी भारतीय तपास यंत्रणेचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवावा, असे आवाहन सय्यद मीर मुख्तार यांनी उपस्थितांच्या वतीने ध्वनिक्षेपकांवरून केले.
दहा वाजता नमाजपठणाला सुरुवात झाली. प्रारंभी खतीब यांनी उपस्थितांना नमाजपठणाची पद्धत सांगितली. त्यानंतर नमाजपठणाला प्रारंभ करण्यात आला. वीस मिनिटांमध्ये नमाजपठणाच्या सोहळ्याची सांगता झाली. दरम्यान, खतीब यांनी ईदच्या पावन दिवसाच्या औचित्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. उपस्थितांनी प्रार्थनेला ‘आमीन’ म्हणत प्रतिसाद दिला. सोहळ्याची सांगता सामूहिक दरुदोसलामच्या पठणाने करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Dua for integration; Terrorism Protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.