आर्द्राही कोरडे; पुनर्वसू पडणार?

By Admin | Updated: June 30, 2014 00:52 IST2014-06-30T00:46:26+5:302014-06-30T00:52:11+5:30

आर्द्राही कोरडे; पुनर्वसू पडणार?

Dry dry; Will it be rehabilitated? | आर्द्राही कोरडे; पुनर्वसू पडणार?

आर्द्राही कोरडे; पुनर्वसू पडणार?

नाशिक : मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रही कोरडे जात असल्याने नाशिककरांच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. शहरवासीयांची पावसाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणाऱ्या पुनर्वसू नक्षत्रात समाधानकारक पावसाची शक्यता ज्योतिषतज्ज्ञांनी वर्तवली आहे, तर हवामान खात्यानेही याच काळात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
यंदा ८ जून रोजी मृग नक्षत्राला प्रारंभ झाला खरा; मात्र या नक्षत्राने नागरिकांच्या अपेक्षांवर पाणीच फेरले. या काळात पावसाचा थेंबही न पडल्याने सर्वांनाच आर्द्राचे वेध लागले. भीजपावसासाठी प्रसिद्ध असलेले हे नक्षत्र २२ जून रोजी लागले; मात्र त्यानेही निराशाच केली. या नक्षत्रातही पावसाने पाठ फिरवली. आता येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्राला प्रारंभ होत आहे. सिंह लग्न असलेल्या या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. रविच्या संक्रमणाचा काळ असलेल्या या नक्षत्रात अपेक्षित पर्जन्यवृष्टी होईल, असा ज्योतिषतज्ज्ञांचा होरा आहे. साधारणत: १२ ते १५ जुलैदरम्यान चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० जुलै रोजी लागणाऱ्या पुष्य नक्षत्रातही समाधानकारक पावसाचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तवले असल्याचे अभ्यासक रत्नाकर संत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Dry dry; Will it be rehabilitated?