जीर्ण वटवृक्ष उन्मळला
By Admin | Updated: July 5, 2016 00:35 IST2016-07-04T23:13:00+5:302016-07-05T00:35:09+5:30
दारणा : धरणाकडे जाणारा मार्ग बंद

जीर्ण वटवृक्ष उन्मळला
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाकडे जाणाऱ्या अस्वली स्टेशन ते साकूर फाट्यादरम्यान महामार्ग क्र . ३७ वर पाची पुलाजवळ आज सकाळी
८ वाजेच्या सुमारास अंदाजे दीडशेवर्षीय महाकाय वटवृक्ष उन्मळून पडल्याने अनेक वाहनधारकांना माघारी फिरावे लागले.
शनिवारपासून पूर्वभागात सतत पाऊस सुरू असल्याने कदाचित जीर्ण झाल्याने हे वडाचे झाड महामार्गावर उन्मळून पडले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सिन्नर शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना माघारी फिरावे लागले. तर जवळच असलेल्या ब्रिटिशकालीन दारणा धरणावर अनेक पर्यटक येत असतात त्यांनादेखील पुढे जाणे अवघड होऊन बसले. दरम्यान, नांदगाव बुद्रूक येथील शाळकरी व महाविद्यालयीन मुलांना हे झाड पडल्यामुळे खूप मोठा त्रास सहन कारावा लागला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाचे काम कोणत्याही वटवृक्षाची तोड न करता मोठ्या दिमाखात झाले होते; मात्र काही वटवृक्ष जास्तच जीर्ण झाल्याने मृत्यूला आमंत्रण देत आहे. या महामार्गावरून अनेक कामगार नाशिक वाडीवऱ्हे आदि ठिकाणी कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जात असतात.
रात्री-अपरात्री त्यांना प्रवास करावा लागतो.
जीर्ण झालेल्या वडाच्या झाडांमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकानी केली आहे.(वार्ताहर)