पाटोदा परिसरात दुष्काळाच्या झळा
By Admin | Updated: March 16, 2016 23:53 IST2016-03-16T23:47:52+5:302016-03-16T23:53:29+5:30
टॅँकरची मागणी : हंडाभर पाण्यासाठी सकाळपासून सुरू होते धावपळं

पाटोदा परिसरात दुष्काळाच्या झळा
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा व परिसरातील ठाणगाव, कानडी, मुरमी, आडगाव रेपाळ, पिंपळगाव लेप, भाटगाव, जऊळके, देवरगाव या गावांत सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. पाण्यासाठी पहाटेपासून ते दिवस मावळेपर्यंत धावाधाव करावी लागते तेव्हा कुठे घागरभर पाणी मिळते असे चित्र बहुतांश गावांत पाहावयास मिळत आहे.
मागील तीन वर्षांपासून पर्जन्यमानात सातत्याने घट झाली. पाऊस न झाल्यामुळे शेतीच्या हंगामात पेरण्या करूनही शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसेही वाया गेले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत त्यांच्या विहिरी, बोअरलाही पाणी पातळी खालावल्यामुळे पाणी राहिले नाही. अशा परिस्थितीत शेतातील पिकांना पाणी कुठून देणार, हा विचार करून शेतकरी शेतातील कामे गुंडाळून बसला आहे. पाऊस न पडल्याने पाटोदा व परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. परिसरातील मुरमी, आडगाव रेपाळ, बाळापूर, खैरगव्हाण या गावांना तीन- चार महिन्यांपासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातील काही गावांना भर पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा केला जात होता यावरूनच या भागातील दुष्काळाची दाहकता दिसून येते.
चटके देणाऱ्या उन्हामुळे ग्रामीण भागातील पाणवठे कोरडे होऊन जनावरांनाही प्यायला पाणी मिळण्याची मारामार सुरू आहे. सद्यस्थितीला पाटोदा परिसरात हजार फूट खोलवरदेखील पाणी मिळेल याची खात्री राहिलेली नाही. ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठला असल्याने रात्री- बेरात्री विहिरींच्या तळापर्यंत उतरून पाणी भरण्याची धडपड करीत आहेत. काही बोअरला दिवसा पाण्याचा थेंबही येत नाही. परंतु रात्री उशिरा बोअर सुरू केले तर एखादे भांडे पाणी मिळण्याची खात्री वाटत असल्याने रात्रीच्या वेळी पाणी घेण्यासाठी महिला व पुरुषांची लगबग दिसत आहे. प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.