दुष्काळात तेरावा : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; व्यापाऱ्यांची खरेदीसाठी बाहेरच्या बाजारपेठेत धाव
By Admin | Updated: March 24, 2016 22:41 IST2016-03-24T22:41:13+5:302016-03-24T22:41:13+5:30
उन्हाच्या तडाख्याने पालेभाज्या कडाडल्या

दुष्काळात तेरावा : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; व्यापाऱ्यांची खरेदीसाठी बाहेरच्या बाजारपेठेत धाव
सिन्नर : सलग पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतीसाठी पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. उन्हाळाचा तडाखा वाढताच शेतकऱ्यांकडील भाजीपाला संपुष्टात आला आहे. लग्नसराई व पाणीटंचाईमुळे भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडे भाजीपाला नसल्याने व्यापाऱ्यांनाही माल खरेदीसाठी
घोटी व नाशिकच्या बाजारपेठेत धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. भाजीपाल्याचे
भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्यास प्रारंभ झाला आहे.
फाल्गुन महिन्यातच वैशाख वणव्याची अनुभूती येऊ लागली आहे. ऊन तापल्याने विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे लागवड केलेला भाजीपाला येईलच याची शाश्वती नाही. कांद्याचे भावही काही प्रमाणात कमी झाल्याने व पाण्याची शाश्वती नसल्याने अनेकांनी कांद्याची पात बाजारात विक्रीसाठी आणल्याचेही चित्र आहे. उन्हाच्या तडाख्याचा परिणाम भाजीपाल्याच्या किमतीवर झाला आहे. गेल्या महिन्यात असलेले भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांना भाजीबाजारात जाताना खिसा गरम ठेवून जावे लागत आहे.
अनेकदा फ्लॉवर व कोबीचे गड्डे बळजबरीने विक्री केले जातात. मात्र त्यांनाही उन्हाच्या तडाख्यामुळे चांगला भाव आला आहे. भेंडी ४० रुपये तर हिरवी मिरची ७० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. उन्हाळ्यामुळे काकडी व लिंबालाही चांगला भाव आला आहे.
काकडी ४० रुपये तर लिंब ७० रुपये किलोदराने विकले जात
आहेत. ढोबळी मिरची ४० रुपये, तर गवार ८० रुपये किलो झाली आहे. गाजर ३० ते ४० रुपये किलो असून, शेवग्याच्या शेंगाचेही भाव कडाकडले आहेत. वाढत्या उन्हासोबतच पालेभाज्यांचे भावही वाढत जातील यात शंका नाही.