दुष्काळी परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 23:11 IST2016-04-03T23:07:50+5:302016-04-03T23:11:46+5:30
दिंडोरी : राजकुमार बडोले यांचा पदाधिकाऱ्यांसमवेत दिंडोरी तालुका दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा
दिंडोरी : राज्याचे सामाजिक न्याय व सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिंडोरी तालुक्याचा दौरा करत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत रखडलेल्या मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी धरणांतील पाणी वाटप करताना प्रशासन स्थानिक जनतेवर अन्याय करत असल्याचा आरोप अनेकांनी करत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली केली. बडोले यांनी यासंदर्भात जनतेच्या भावना लक्षात घेत प्रशासनाला दुष्काळी परिस्थितीत अडचणीच्या काळात स्थानिक जनतेला मदत करण्याच्या सूचना केल्या जातील, असे सांगत याबाबत जिल्हास्तरावर बैठक घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार हरिश्चंद चव्हाण यांनी आज सकाळी ८ वाजेपासून तालुक्याच्या दौऱ्यास सुरुवात केली. प्रारंभी आंबेदिंडोरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या घर व स्मारकास भेट दिली. यानंतर ढकांबे येथील सानप नर्सरी येथील हायड्रो प्रकल्पास भेट दिली. यानंतर दुपारी दिंडोरी येथील ऐतिहासिक रणतळ येथील तलावातील लोकसहभागातून सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाला भेट दिली.
अवनखेड येथील संसद ग्रामपंचायतीला भेट देत विकासकामांची पाहणी केली. रखडलेल्या मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी करून सायंकाळी दिंडोरी पंचायत समिती सभागृहात तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.
दुष्काळी आढावा बैठकीत भाजपा नेते चंद्रकांत राजे यांनी पाणीप्रश्नावर बोलताना अंतरराष्ट्रीय पातळीवर रोल मॉडेल म्हणून पहिल्या जाणाऱ्या वाघाड प्रकल्पात प्रशासन शेतकऱ्यांचे हक्काचे राखीव पाणी सोडण्याबाबत दाखवत असलेल्या अनास्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा लोकप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.
शिवसेना नेते जयराम डोखळे यांनीही पाणीनियोजन व वीजपुरवठाबाबत प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र ढगे यांनी चिकाडी येथे साठवण बंधारा बांधण्यासाठी असलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी केली. दिंडोरीचे उपनगराध्यक्ष यांनी नगरपंचायतीस कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अधिकारी वर्ग देण्याची मागणी करत निधी देण्याची मागणी केली.
यावेळी बडोले यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना धरणात किती पाणी आहे, नियोजनबाबत काय उपाययोजना आहे, हे विचारले असता मात्र त्यांना परिपूर्ण माहिती देता आली नाही. प्रारंभी प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी तालुक्याचा आढावा मांडत दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजपा नेते चंद्रकांत राजे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा बोडके, श्याम बोडके, भाजपा तालुकाध्यक्ष संजय कावळे, सुरेश डोखळे, जयराम डोखळे, भास्कर भगरे, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, राजेंद्र ढगे, नरेंद्र जाधव, योगेश बर्डे, सभापती अलका चौधरी, उपसभापती छाया डोखळे, महिला बालकल्याण सभापती शोभा डोखळे, जि.प. सदस्य संगीता ढगे, जयश्री सातपुते आदिंसह सर्व पंचायत समितीचे सदस्य, अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)