उमराणे : अवघ्या तीनदिवसांवर येऊन ठेपलेल्या पोळा सणावर दुष्काळी परिस्थितीमुळे सावट उभे ठाकले आहे. उमराणे येथे भरलेल्या आठवडे बाजारात बैलांचा साज खरेदी करण्याकडे बहुतांश शेतकर्यांनी पाठ फिरविल्याने बाजारात शुकशुकाट दिसुन आला. परिणामी काही विक्र ेत्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. शेतकरी बांधवांना दरवर्षी पोळा सणाचे वेध लागलेले असतात. वर्षभर शेतात राबणार्या सर्जा-राजाला सजवून ग्रामदैवताभोवती मिरविणाच्या पारंपरिक प्रथेनुसार साज म्हणून नाथ, माथोट्या, गोंडे, शेल, पैंजण, बेगडी, घुंगरमाळ, रंगरंगोटी, फुगे आदी विविध वस्तू खरेदी करु न पोळा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्याची हौस असते. त्या अनुषंगाने येथील आठवडे बाजारात बैलाचा साज विक्र ीसाठी मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी गर्दी केली होती. परंतु दोन वर्षांपासून उमराणेसह परिसरातील गावात वरुणराजाच्या अवकृपेने समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. चालुवर्षी तर भीषण दुष्काळामुळे शेतकर्यांना जनावरांना पिण्याच्या पाण्यासह चारा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव सर्जा-राजाला विकण्याची वेळ आली होती. याशिवाय सद्यस्थितीत पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले तरीही उमराणेसह परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने त्यातच लष्करी अळीने थैमान घातल्याने खरीप हंगामही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकरी बांधवांवर दुष्काळाच्या सावटामुळे पोळा सण साजरा करण्याचे संकट उभे राहिल्याने याचा परिणाम आठवडे बाजारात विक्र ीसाठी आलेल्या वस्तूच्या खरेदी विक्रीवर झाला आहे. काही दुकानदारांची तर बोहणीही झाली नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागल्याचे दुकानदारांनी सांगितले.
पोळा सणावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:23 IST