आंतरराज्य वाहतुकीत चालकांना कोविड टेस्टची सक्ती नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST2021-05-18T04:16:01+5:302021-05-18T04:16:01+5:30
नाशिक देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहतूकदारांना परराज्यात मालवाहतूक करताना आरटीपीसीआर कोविड टेस्टची ...

आंतरराज्य वाहतुकीत चालकांना कोविड टेस्टची सक्ती नको
नाशिक देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहतूकदारांना परराज्यात मालवाहतूक करताना आरटीपीसीआर कोविड टेस्टची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल देशमुख यांच्यासह केंदीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. कोविड टेस्टच्या सक्तीमुळे राज्यांच्या सीमेवर जीवनावश्यक मालांची वाहनेही अडकून पडल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन मालवाहतूक दार संघटनांकडूनही स्वागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट करतानाच शासन नियमावलीनुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर कोविड टेस्ट बंधनकारक केल्याने वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे राजेंद्र फड यांनी निवेदनाच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे. मालवाहतूक करणारा चालक सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात येत नाही, तो थेट माल पोहोचविण्याच्या ठिकाणी जातो. त्याठिकाणी गेल्यानंतर तसेच प्रवासादरम्यान तो कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करतो. त्यामुळे इतर राज्यांत वाहतूक करण्यासाठी वाहतूकदार चालकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
कोट-
महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे चालकांचीही मोठी गैरसोय होत असून राज्यात येणारा जीवनावश्यक मालही अडकून पडला आहे. आरटीपीसीआरचा आग्रह न करता वाहनांना प्रवेश देण्यात यावा.
- राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन.
===Photopath===
170521\17nsk_38_17052021_13.jpg
===Caption===
राजेंद्र फड