ट्रकच्या धडकेत बसचालक ठार
By Admin | Updated: November 23, 2015 23:46 IST2015-11-23T23:45:28+5:302015-11-23T23:46:36+5:30
ट्रकच्या धडकेत बसचालक ठार

ट्रकच्या धडकेत बसचालक ठार
नाशिकरोड : सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शिंदे गाव बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेत उभे असलेले आगार क्रमांक एकचे महामंडळाचे वाहनचालक भरत लक्ष्मण लिंबाळकर (३५, रा. शिंदेगाव) यांना सिन्नरकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, अपघातग्रस्त ट्रक जप्त केला आहे.
आगार क्रमांक एकमध्ये वाहनचालक म्हणून नोकरीला असलेले लिंबाळकर हे नेहमीप्रमाणे नोकरीवर रुजू होण्यासाठी थांब्यावर बसची प्रतीक्षा करत उभे होते. यावेळी सिन्नरकडून लोखंडी पाइप घेऊन नाशिककडे जाणारा ट्रक (एमएच १२ क्यूए ८८९२) शिंदे गावातील गतिरोधक टाळण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्यालगत बसच्या थांब्यावर उभे असलेले लिंबाळकर यांना धडकला. या घटनेत लिंबाळकर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रकचालक दत्तात्रय सीताराम लेटे (वय ५०, नारायणगाव, मांजरवाडीरोड, ता. जुन्नर) याच्याविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दत्तात्रय लेटे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लिंबाळकर यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.