मुस्लीम बांधवांनी पुरविले पिण्याचे पाणी
By Admin | Updated: September 24, 2016 23:44 IST2016-09-24T23:44:20+5:302016-09-24T23:44:44+5:30
जातीय सलोखा : राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

मुस्लीम बांधवांनी पुरविले पिण्याचे पाणी
नाशिक : विविधतेत एकता हीच अखंड भारताची ओळख असून, सुफी संतांच्या महाराष्ट्रात राष्ट्रीय एकात्मता नेहमीच अनुभवयास येते. एकात्मता आणि जातीय सलोख्याचे दर्शन मराठा क्रांती मूक मोर्चामध्येही घडले. मोर्चेकऱ्यांना मुस्लीम कार्यकर्त्यांनी पिण्याचे पाणी देत त्यांच्या तहानेची जाणीव असल्याचे दाखवून दिले.
कोपर्डीच्या अमानुष घटनेतील संशयित आरोपींविरुद्ध अतिजलद न्यायालयात खटला चालवून त्यांना मरेपर्यंत फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यातील त्रुटी दूर करून पुनर्रचना करावी, शिवजयंती संपूर्ण राज्यात एकाच दिवशी (१९ फेब्रुवारी) साजरी करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे आदि मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील मराठा समाजबांधव शनिवारी (दि.२४) रस्त्यावर उतरले होते. या मोर्चात शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच लोक लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, युवतींचा सहभागही लक्षणीय होता.
तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे कान्हेरे मैदानापर्यंत पायी चालणाऱ्या मोर्चेकऱ्यांना येणारा थकवा, गर्दीमुळे येणारा घाम आणि दमट हवेमुळे घशाला पडणारी कोरड अशा शारीरिक समस्यांची जाणीव मुस्लीम समाजाच्या काही संघटनांनी ठेवली. जुना आडगाव नाका येथे युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने बबलू शेख, कादीर खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याचे शेकडो पाऊच वाटप केले. तसेच खडकाळी सिग्नलवर युवा सोशल अँड एज्युकेशन मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. यावेळी असलम खान, गुलाम गौस पाटकरी, सोहेल खान, युनूस खान, एजाज शेख यांच्यासह मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांना मुस्लीम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पिण्याचे पाणी वाटप करून जातीय सलोख्याचे दर्शन घडविले. याबरोबरच ‘हम सब एक है’चा संदेश देत राष्ट्रीय एकात्मता जोपासली. (प्रतिनिधी)