वाळलेले झाड कोसळले

By Admin | Updated: August 12, 2016 22:50 IST2016-08-12T22:50:03+5:302016-08-12T22:50:22+5:30

नागरिकांच्या रोषानंतर सहा झाडे तोडली

The dried tree collapses | वाळलेले झाड कोसळले

वाळलेले झाड कोसळले

नाशिक : धोकादायक वृक्षांमुळे दिवसेंदिवस जीवघेणा बनत चाललेल्या गंगापूररोडवर शुक्रवारी सकाळी नवशा गणपती मंदिराजवळ एक वाळलेला वृक्ष कोसळून दुचाकीवरून जाणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांचा जमाव जमत त्यांनी महापालिका आणि वृक्षप्रेमींविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला. अखेर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करत गंगापूररोडवरील सहा वाळलेली धोकादायक झाडे तोडण्यात आली. गंगापूररोड परिसरात एकूण २३ झाडे धोकादायक स्थितीत आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गंगापूररोडचे विस्तारीकरण हाती घेतले, परंतु रस्त्यात अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्यास काही पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतली आणि प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचले. वाद-प्रतिवादानंतर न्यायालयाने अखेर काही अटी-शर्तींवर झाडे तोडण्यास परवानगी दिली असली तरी वृक्षप्रेमींकडून त्यास विरोध कायम आहे. रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या झाडांमुळे गंगापूररोड जीवघेणा बनत चालल्याने परिसरातील नागरिकांनी सदर झाडे तातडीने हटविण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नवशा गणपतीजवळ एक वाळलेले झाड दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा कामगारांवर पडले. त्यात दोन्ही कामगार जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेनंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महापालिका व तथाकथित वृक्षप्रेमींविरुद्ध संताप व्यक्त केला. याचवेळी स्थानिक नगरसेवक विलास शिंदे, विक्रांत मते यांनीही सदर झाडे तातडीने तोडण्याविषयी आग्रह धरला. नागरिकांचा वाढता रोष पाहता महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. यावेळी परिसरातील २३ वाळलेल्या धोकादायक झाडांपैकी सहा झाडे तातडीने तोडण्यात आली. अगदीच भुसा झालेल्या आणि कुजलेल्या या झाडांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. आठ दिवसांपूर्वीच भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले झाड सिल्व्हर ओक शाळेच्या बसवर कोसळले होते. त्यात बसचालक जखमी झाला होता, तर तीन दिवसांपूर्वी एक झाड कोसळले होते. पावसामुळे सदर धोकादायक झाडे कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने ती तातडीने तोडण्याची मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The dried tree collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.