तीन प्रकारांच्या एकत्रीकरणातून साकारले नाटक
By Admin | Updated: October 24, 2015 22:19 IST2015-10-24T22:19:21+5:302015-10-24T22:19:54+5:30
गढीवरच्या पोरी : शहरातील कलावंतांचा नाट्य क्षेत्रात आगळा प्रयोग

तीन प्रकारांच्या एकत्रीकरणातून साकारले नाटक
नाशिक : नाटकाची मळलेली पायवाट सोडून नव्या वाटा चोखाळू पाहणाऱ्या शहरातील दोघा कलावंतांनी ‘गढीवरच्या पोरी’ या नाटकाच्या निमित्ताने आगळा प्रयोग केला आहे. नाटकाचे तीन फॉर्म एकत्र करून ही आगळी कलाकृती साकारली जात असून, त्यात पाच तरुणींच्या पात्रांतून कथा उलगडून दाखवण्याचाही प्रयोग करण्यात आला आहे.
नाट्यलेखक दत्ता पाटील लिखित या दीर्घांकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे करीत आहेत. नाटकात मोहिनी पोतदार, दीप्ती चंद्रात्रे, मयूरी मंडलिक, नूपुर सावजी व श्रद्धा देशपांडे या तरुणी भूमिका साकारत आहेत. गढी म्हणजे परंपरेचा बंदिस्त बुरुज. या प्रतीकात्मक बुरुजाच्या आतून आपापल्या विश्वाशी मुक्त संवाद साधणाऱ्या पाच तरुणींची कथा या नाटकात मांडण्यात आली आहे. एरवीच्या नाटकात ठरावीक पात्रांतील परस्पर संवादांतून कथा उलगडत जाते. ‘गढीवरच्या पोरी’मध्ये मात्र अभिनेत्यांचा थेट प्रेक्षकांशी संवाद (इंटिमेट थिएटर), प्रेक्षकांशी तटस्थता ठेवून केलेला अभिनय (की होल्ड ड्रामा) व एकल नाट्य अशा तीन तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. आजवरच्या नाट्य क्षेत्रात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला असल्याचा दावाही केला जात
आहे. (प्रतिनिधी)