‘शिक्षण हक्क’चा शासनाकडून दुराग्रह
By Admin | Updated: March 16, 2015 01:09 IST2015-03-16T01:09:18+5:302015-03-16T01:09:31+5:30
घरचा अहेर : ‘शिक्षणतपस्वी’ पुरस्कार वितरण सोहळ्यात अभ्यंकर यांची टीका

‘शिक्षण हक्क’चा शासनाकडून दुराग्रह
नाशिक : शिक्षण हक्क कायद्याचा शासनाकडून दुराग्रह धरला जात असून, तो शिक्षकांना जाचक ठरत आहे. या कायद्यामुळे राज्यातील पंधरा-वीस हजार शिक्षक, शिक्षणसेवक अतिरिक्त ठरले आहेत. शिक्षणव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याऐवजी निव्वळ कायदे करणारे शासन शिक्षणाबद्दल गंभीर नाही, अशी टीका करीत शिवसेनेच्या राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी भाजपाला घरचा अहेर दिला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित ‘शिक्षणतपस्वी’ पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. माजी आमदार बबन घोलप, मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, दत्ता गायकवाड, संजय चव्हाण आदि व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात घोलप व अभ्यंकर यांच्या हस्ते प्रा. सूर्यकांत रहाळकर व प्रा. श्याम पाटील यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय विभागस्तरावरील आठ, जिल्हास्तरावरील २९, तर विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल पाच शिक्षकांनाही गौरवण्यात आले. यावेळी अभ्यंकर म्हणाले की, ‘असर’ संस्थेच्या अहवालामुळे शिक्षकांची समाजात नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. जोपर्यंत शिक्षक समाधानी होत नाही, तोपर्यंत शिक्षणव्यवस्था सुधारणार नाही. शिक्षणाच्या खालावलेल्या स्थितीला फक्त शिक्षकच जबाबदार नाहीत. सरकारकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. निव्वळ कायदे करून व्यवस्था सुधारत नाही. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारच गंभीर नसून, तुटपुंजी आर्थिक तरतूद केली जाते. या कायद्यामुळे हजारो शिक्षक, शिक्षणसेवक देशोधडीला लागले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी सत्काराला उत्तर देत उत्तम पगार व सुविधांची अपेक्षा करणाऱ्या शिक्षकांनी आपण समाजाला नेमके काय देतो, याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. शिक्षकांनी आधुनिकतेशी जुळवून घ्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार बोरस्ते यांनी शिक्षकांमध्ये सरकार अनुदानित, विनाअनुदानित अशी चातुर्वण्य व्यवस्था निर्माण करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याशिवाय पुरस्कारार्थी शिक्षकांनीही मनोगते व्यक्त केली. संजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे व लक्ष्मण महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर वाघ, दीपक गवते, राजेंद्र सावत आदिंसह शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)