नाशिक : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांकडून रॅगिंगमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाने विशेष त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली असून, या समितीकडून डॉ. स्वप्निल शिंदे मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.
डॉ. स्वप्निल शिंदे यांची रॅगिंग झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत शिक्षण घेत असलेल्या मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने रॅगिंग प्रकरणाची चौकशी समिती नेमली आहे. या समितीत एका जिल्ह्यातील सदस्यासह जिल्ह्याबाहेरील दोन सदस्यांचा समावेश असून, ही समिती डॉ. स्वप्निल यांच्या रॅगिंगसंदर्भात चौकशी करणार आहे. या समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश विद्यापीठामार्फत देण्यात आला आहे. समितीच्या अहवालानंतरच विद्यापीठामार्फत पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच कॉलेज प्रशासनाकडेही या प्रकाराबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाची राज्य शासन स्तरावर चौकशी केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही स्पष्ट केले आहे.