डॉ. स्वप्नील शिंदे मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:58+5:302021-09-24T04:17:58+5:30
नाशिक : आडगाव शिवारातील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोगतज्ज्ञ विभागातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या डॉ. स्वप्नील शिंदे यांच्या ...

डॉ. स्वप्नील शिंदे मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम
नाशिक : आडगाव शिवारातील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोगतज्ज्ञ विभागातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या डॉ. स्वप्नील शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी आडगाव पोलिसांनी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींसह प्रशिक्षणार्थी डॉक्टर, प्राध्यापक व कर्मचारी मिळून जवळपास २०हून अधिक जणांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहेत. मात्र, अजूनही डॉ. शिंदे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याने पोलिसांना आता व्हिसेराच्या अहवालाची प्रतीक्षा लागली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. स्वप्नील शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे शवविच्छेदनानंतर त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. या व्हिसेराचा अहवाल तसेच न्यायसहायक प्रयोगशाळेचा अहवाल अजूनही पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे डॉ. शिंदे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट होऊ शकले नसून व्हिसेराचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणातील अधिक सत्यता समोर येऊ शकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी डॉ. शिंदे यांच्या मृत्यूनंतर महाविद्यालयातील प्राध्यापक, परिचारिका तसेच अन्य सहकाऱ्यांचा जाबजबाब नोंदवून घेतला असून, यातून डॉ. शिंदे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी व्हिसेरा अहवाल मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. मागील दोन महिन्यांत पोलिसांना व्हिसेराचा अहवाल प्राप्त होऊ शकला नसल्याने या प्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे.