डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू
By Admin | Updated: April 26, 2015 01:24 IST2015-04-26T01:21:30+5:302015-04-26T01:24:45+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा दलितमुक्ती हा केवळ आरंभबिंदू होता. त्यांचे अंतिम लक्ष्य हे हिंदू समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करणे होते, असा दावा ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे यांनी केला. आंबेडकरांना ठराविक चौकटीत बंदिस्त करणे हे त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वावर अन्याय करण्यासारखे ठरेल, असेही ते म्हणाले. साप्ताहिक विवेक व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पतंगे लिखित ‘सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आपली भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायकदादा पाटील होते. न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल विचारमंचावर उपस्थित होते. पतंगे म्हणाले की, बाबासाहेबांवर टोकाचा भक्तिभाव व्यक्त करणारी व टीका करणारी अशी दोन्ही गटांची माणसे समाजात आहेत. बाबासाहेबांबद्दल बुद्धीमध्ये वाळवी निर्माण करण्याचे काम काही लोक करीत आहेत. बाबासाहेबांचा लढा हा हिंदू धर्मशास्त्राविरोधात होता, हिंदू परंपरा नष्ट झाल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. तथापि, डॉ. आंबेडकर यांचे समग्र व्यक्तिमत्त्व अत्यंत व्यापक होते. दलितमुक्ती हा त्यांच्या कामाचा केवळ आरंभबिंदू होता. हिंदू समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करणे हे त्यांचे लक्ष्य होते. देशातील स्त्रियांची प्रगती, बाळंतपणाची रजा, बालविवाहावर बंदी, मुलांना पित्याच्या संपत्तीत वाटा, कामगारांना आठ तासांच्या कामाची मर्यादा आदि अनेक गोष्टींचे श्रेय बाबासाहेबांचे असल्याचेही ते म्हणाले.
विनायकदादा पाटील यांनी सांगितले की, मोठ्या कलाकृती, व्यक्तिमत्त्वे समजण्यास कठीण असतात. आपले वय वाढते, तसतशी ती अधिक कळत जातात. आंबेडकर, गांधी व विवेकानंद या व्यक्तिमत्त्वांनी सृष्टीला धक्के दिले. आंबेडकरांना एखादा धर्म जखडून ठेवू शकत नाही. ते युगप्रवर्तक नेते होते. अशा व्यक्ती माणूस नव्हे, तर देवत्वाचे अधिकारी असतात, सृष्टीचे उद्रेक असतात.
प्रारंभी शीतल खोत यांनी ‘साप्ताहिक विवेक’विषयी माहिती दिली. ‘पांचजन्य’ व ‘आॅर्गनायझर’च्या आंबेडकर विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले. रवींद्र बेडेकर यांनी गीत सादर केले. बापू जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)