वाडीवऱ्हे दरोड्याचा छडा
By Admin | Updated: March 23, 2017 22:51 IST2017-03-23T22:51:33+5:302017-03-23T22:51:48+5:30
नाशिक : लुटीची घटना रविवारी साडेअकराच्या सुमारास घडली होती. या दरोड्याचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

वाडीवऱ्हे दरोड्याचा छडा
नाशिक : एका विदेशी कंपनीच्या मद्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक अडवून लुटीची घटना रविवारी (दि. ५) साडेअकराच्या सुमारास घडली होती. या दरोड्याचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिंडोरी येथून एका विदेशी कंपनीच्या मद्याच्या बाटल्या असलेले खोके आयशर ट्रकमधून (एमएच ४१ जी. ७०२९) नीलेश देसले मुंबईच्या दिशेने जात होते. वाडीवऱ्हे शिवारातील रायगडनगर परिसरात एका काळ्या रंगाच्या मोटारीतून पाच संशयितांनी आयशरला ओव्हरटेक करत मोटार आडवी लावली. यावेळी या दरोडेखोरांनी ट्रकचालक देसले यांना मारहाण करून विदेशी मद्याच्या बाटल्यांचे सहाशे खोके, आयशर ट्रकसह रोख रक्कम असा एकूण २९ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. तसेच देसले यास मोटारीमध्ये टाकून सिन्नर-घोटी मार्गावरील जंगलात सोडून दिले होते. याप्रकरणी देसले यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात घडला प्रकार कथन करत अज्ञात संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
या दरोड्याच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी लक्ष घालून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या पथकाला मार्गदर्शन करीत संशयितांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नवले यांनी शहर व ग्रामीण भागातील विविध खबऱ्यांकडे चौकशी करत तपासाला गती दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शहरात संशयित दडून बसल्याचा सुगावा पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी तत्काळ धाडसत्र सुरू करून पाचही संशयितांना विविध भागांमधून शिताफीने ताब्यात घेतले आहे.