मजुरीच्या पैशातून शाळेला दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2015 21:35 IST2015-12-04T21:33:32+5:302015-12-04T21:35:01+5:30
शुभवर्तमान : पेठ तालुक्यातील म्हसणविहिरा ग्रामस्थांचे कौतुक

मजुरीच्या पैशातून शाळेला दान
पेठ : म्हसणविहिरा. पेठ तालुक्यातील एकेकाळचा सर्वाधिक व्यसनी म्हणून ओळखला जाणारा आदिवासी पाडा. या गावाला पेठ तालुक्याचे कुवेत संबोधले जात
होते़ मात्र आज याच गावाने
शिक्षणात क्रांती करून रोजच्या मजुरीतले पैसे वाचवून शाळेचा विकास केला असून, आज म्हसणविहिरा गावची शाळा ही डिजिटल शाळा ठरली आहे़
म्हसणविहिरा हे गाव म्हणजे जवळपास ३५० लोकसंख्येचा
पाडा. सन २००१ मध्ये या गावात वस्तीशाळा सुरू करण्यात आली़ एका खासगी घराच्या पडवीत येथील विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे गिरवू लागले़ सन २००८ मध्ये या शाळेचे नियमित शाळेत रूपांतर झाले़ शाळेला सर्वशिक्षा अभियानामधून खोलीही मंजूर झाली. पण जागेचा प्रश्न निर्माण झाला़ शिक्षकांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समस्या मांडली़
याच गावातील भास्कर लक्ष्मण बदादे या ग्रामस्थाने आपल्या शेतजमिनीतील दोन गुंठे जागा शाळेला दान केली़ या ठिकाणी वर्गखोली बांधण्यात आली़ ग्रामस्थांनी जवळपास पन्नास हजार रुपयांचे श्रमदान करून सपाटीकरण केले़ शाळेला वर्गणी करून पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली़
पंचायत समितीचे उपसभापती महेश टोपले यांच्या हस्ते संगणक हस्तांतरण सोहळा संपन्न झाला़ यावेळी गटविकास अधिकारी बी़ बी़ बहिरम, माजी जि़ प़ सदस्य सुधाकर राऊत, गटशिक्षणाधिकारी के. बी़ माळवाळ, विस्तार अधिकारी एस़ एऩ झोले, व्ही़ एस़ खैरनार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पवार, सरपंच, केंद्रप्रमुख पागी, जगन्नाथ जाधव, श्रीमती आढाव, आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मनोहर टोपले, तालुकाध्यक्ष राजेंद्र भोये, शिक्षक संघाचे अध्यक्ष रामदास शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कौशल्या कडाळी, माता पालक संघाच्या अध्यक्ष हेमलता कडाळी, वैशाली भुसारे, गंगाधर कडाळी, युवराज भुसारे, यशवंत वार्डे, पुंडलिक वार्डे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते़ हनुमंत खंबाईत यांनी सूत्रसंचालन केले. अशोक पवार यांनी आभार मानले़ (वार्ताहर)