घराणेशाही कायम

By Admin | Updated: February 8, 2017 00:30 IST2017-02-08T00:30:03+5:302017-02-08T00:30:20+5:30

मिनी मंत्रालय : घमासान रंगणार; नाराजीचा बसणार फटका

Domestically retained | घराणेशाही कायम

घराणेशाही कायम

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जिल्ह्यातून अनेक आजी-माजी आमदार व खासदारपुत्रांची तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष माजी आमदारांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने निवडणूक घमासान होण्याची चिन्हे आहेत. याच अनुषंगाने मिनी मंत्रालयासाठी घराणेशाहीची परंपराही कायम राहिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  एकलहरे गटातून खासदारपुत्र अजिंक्य हेमंत गोडसे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. अर्थात, त्यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेल्या शंकर धनवटे यांच्यासाठी एकलहरे ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या घरातही एक नव्हे तर दोन दोन उमेदवारांचे ‘दान’ भाजपाने टाकले आहे. खासदारपुत्र समीर चव्हाण कनाशी (कळवण) गटातून निवडणूक लढवित असून, खासदारांच्या पत्नी कलावती चव्हाण हट्टी (सुरगाणा) गटातून निवडणूक लढवित आहेत. आमदार निर्मला गावित यांच्या झोळीतही कॉँगे्रसने दोन उमेदवारी टाकल्या आहेत. मुलगी नयना गावित या वाडीवऱ्हे गटातून, तर चिरंजीव हर्षल गावित ठाणापाडा गटातून निवडणूक लढवित आहेत. आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांनी धोंडमाळ (पेठ) गटातून नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी केली आहे. चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर यांचे चुलत बंधू केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर यांनी लोहणेर (देवळा) गटातून, तर निफाडचे आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू यतिन कदम ओझर गटातून उमेदवारी करीत आहेत. (प्रतिनिधी)
माजी आमदारही सरसावले
माजी आमदारही मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीसाठी मागे नाहीत. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचे चिरंजीव राहुल कोतवाल यांनी तळेगाव रोही (चांदवड), दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर यांनी पालखेड, माजी आमदार धनराज महाले यांनी खेड (दिंडोरी), रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांनी उमराळे (दिंडोरी), माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी देवपूर (सिन्नर), माजी आमदार स्व. डॉ. वसंतराव पवार यांची कन्या अमृता पवार यांनी देवगाव (निफाड), माजी मंत्री अर्जुन पवार यांचे चिरंजीव नितीन पवार यांनी कनाशी, स्नुषा जयश्री पवार यांनी खर्डेदिगर, डॉ. भारती पवार यांनी (मानूर) (सर्व कळवण), माजी आमदार शांताराम अहेर यांच्या स्नुषा लीना योगेश अहेर यांनी वाखारी (देवळा), काशीनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ यांनी शिरसाटे (इगतपुरी), अनिलकुमार अहेर यांची कन्या अश्विनी अहेर यांनी न्यायडोंगरी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Web Title: Domestically retained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.