दिव्यांगांसाठी कर्तव्य समजून काम करावे
By Admin | Updated: August 12, 2016 00:35 IST2016-08-12T00:34:57+5:302016-08-12T00:35:08+5:30
राजकुमार बडोले : अपंग कल्याण राज्य पुरस्कार वितरण सोहळा

दिव्यांगांसाठी कर्तव्य समजून काम करावे
नाशिक : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सातत्याने दिव्यांगांसाठी नेहमीच काम करत आला आहे. शासनाप्रमाणेच समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांगांसाठी आपले कर्तव्य समजून काम करायला हवे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ‘अपंग कल्याण राज्य पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते १२ वैयक्तिक तर दोन नियुक्तक संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास व्यासपीठावर विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उषा बच्छाव, सहसचिव दिनेश डिंगळे, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, शारदा बडोले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदि उपस्थित होते.
या सोहळ्यात १२ वैयक्तिक तर दोन नियुक्तक संस्थांना पुरस्कार वितरित करण्यात आले. अपंग प्रवर्गात सुरेखा ढवळे, जयभीम शिरोडकर, साईनाथ पवार, अंध प्रवर्गात राजेंद्र एन्प्रेंडीवार, प्रभाकर काळबांधे, अशोक आठवले, मतिमंद प्रवर्गात दीपक रॉय, आनंद गुजर, अक्षय कोराळे, कर्णबधिर प्रवर्गात दीपक खानोलकर, प्रशांत अभ्यंकर, संजय परदेशी तर नियुक्तक संस्थांच्या गटात पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अॅण्ड ह्युमन रिसोर्सेस आणि ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ सेवाभावी संस्था (परभणी) यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अशोक आठवले आणि जयभीम शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.