तुमची कामे आम्ही करायची का?
By Admin | Updated: January 6, 2017 00:33 IST2017-01-06T00:33:31+5:302017-01-06T00:33:42+5:30
नव्या खातेधारकांची परवड; ज्येष्ठांनाही फटकार

तुमची कामे आम्ही करायची का?
शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक आणि कर्मचाऱ्यांकडून होणारी टोलवाटोलवी याचा अनुभव अनेकदा येतो. या विषयीच्या तक्रारीदेखील नेहमीच केल्या जातात. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी असलेल्या अशा शासकीय कार्यालयांचा कारभार म्हणूनच नेहमी वादग्रस्त ठरत आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बुधवार,
दि. ४ रोजी शासकीय कामाच्या वेळेत मुख्य टपाल कार्यालयात प्रत्यक्ष थांबून तेथील कामकाजाचे अवलोकन केले.
त्याचा हा आॅन दी स्पॉट वृत्तांत...अहो आजी, चेहरा काही केविलवाणा करू नका बरं का; तुम्हालाच स्लिप भरून द्यावी लागेल, नाही तर उद्या या. अर्ज पूर्ण भरता येत नसेल तर काय मग आम्ही तुमची कामे करायची ? रांगेतून बाजूला व्हा, दुसऱ्याला पुढे येऊ द्या...
तुम्ही सकाळी कामावर जाता याला मी काय करू सांगा ! उद्या तुम्हाला सकाळी रांगेतच उभे राहावे लागेल.
एटीएम कार्डवाल्या मॅडम असतील येथेच, नाहीतर गेल्या असतील रजेवर...
मुख्य टपाल कार्यालयात बुधवारी
(दि. ४) प्रस्तुत प्रतिनिधीने संपूर्ण दिवसाच्या कामकाजाचे अवलोकन केले असता ग्राहकसेवा विभागात ग्राहकांची कशी कोंडी होते याचा असा अनुभव आला. काही अंशी ग्राहकांशी सौजन्य दाखविण्यात आलेही, मात्र काम करताना ग्राहकहितापेक्षा स्वत:ची वेळ पाळूनच ग्राहकांना वेळ दिला जात असल्याचे निदर्शनास आले. सर्वात कहर म्हणजे सेव्हिंग खाते उघडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी इतके सुस्तावलेले होते की केवळ अर्ज स्वीकारण्यासाठी तब्बल १० ते १५ मिनिटांचा अवधी लागत होता. मंगळवारी या खिडकीत असलेल्या ‘मॅडम’ आणि बुधवारी असलेले ‘सर’ सारख्याच गतीचे असल्याचा अनुभव ग्राहकांनी कथन केला. पेन्शनधारक आजी-आजोबांचे तर विचारायलाच नको. बॅँकेचे एटीएम कधी मिळेल याची कोणतीही माहिती तेथील कर्मचाऱ्यांना सांगता आली नाही. (प्रतिनिधी)