काम करा, अन्यथा शाल-श्रीफळ तयार
By Admin | Updated: July 31, 2016 00:23 IST2016-07-31T00:15:18+5:302016-07-31T00:23:10+5:30
अशोक चव्हाण : कॉँग्रेस बैठक : राष्ट्रवादीशी ‘संग’ नको, बैठकीतील सूर

काम करा, अन्यथा शाल-श्रीफळ तयार
नाशिक : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपा सोडा, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला आधी आवरा. त्यांच्यासोबत आघाडी केल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला जात आहे. त्यांच्याशी अजिबात आघाडी करता कामा नये, असा सूर जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोर व्यक्त केला. त्यावर आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हवे ते करा. मात्र आगामी काळात पक्ष मजबूत झाला पाहिजे, नाही तर मी शाल व श्रीफळ विकत घेऊन ठेवले असून, पक्ष मजबूत झाला नाही तर शाल-श्रीफळ देऊन मोकळे करेल, असा परखड इशारा त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.
हॉटेल ग्रीन व्ह्णू येथे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्ह्णातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत बहुतांश तालुकाध्यक्षांनी तसेच लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादीशी आघाडी नको, असा सूर लावला. नाशिक तालुकाध्यक्ष नियुक्तीवरून प्रल्हाद जाधव यांनी ४० वर्षांपासून काम करतो आहे, अजून तालुकाध्यक्ष कोण ते माहीत नाही, असा घरचा अहेर दिला. लक्ष्मण मंडाले यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघ गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडला जात असल्याने भविष्यात या मतदारसंघात पंजा चिन्ह राहील की नाही, असे सांगितले.
अरुण अहेर यांनी तर येवला तालुक्यातील माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कशाप्रकारे दहशत केली. कसे उमेदवार पळविले. कसे कामे देऊन कॉँग्रेसचे पदाधिकारी फोडले, याचे वर्णन करत आता तरी पक्षश्रेष्ठींनी जागे व्हावे, असा सूर लावला.
प्रकाश शिंदे यांनी दिंडोरीत कॉँग्रेसची परिस्थिती चांगली असल्याचे व नगराध्यक्ष कॉँग्रेसचा असल्याचे सांगितले, तर चांदवडमध्ये शिरीषकुमार कोतवालांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत विजय मिळविता येईल, अशी अपेक्षा शंकरराव गांगुर्डे यांनी व्यक्त केली. बागलाणमध्ये पक्ष मजबूत असून, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मन लावून काम केले तर राष्ट्रवादीचा विषयच राहणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले. निफाडमध्ये दहा गट असून, पक्षाने चांगले उमेदवार व पाठबळ दिल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत चांगली परिस्थिती राहील, असे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते यांनी सांगितले.
सिन्नरला कॉँग्रेसची परिस्थिती चांगली राहील, माणिकराव आले आणि गेले तरी कॉँग्रेस तेथेच
आहे, असे विनायक सांगळे व रामराव शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी).