सेंद्रिय शेती करा, शेतीपूरक व्यवसायामध्ये उद्योजक व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:46+5:302021-08-15T04:16:46+5:30
येवला : सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय व शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभे करून युवकांनी उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सेंद्रिय शेती ...

सेंद्रिय शेती करा, शेतीपूरक व्यवसायामध्ये उद्योजक व्हा
येवला : सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय व शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभे करून युवकांनी उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन सेंद्रिय शेती तज्ज्ञ कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सदूभाऊ शेळके यांनी केले.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महिला तक्रार निवारण समितीच्यावतीने आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी शेळके प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. वेद, आयुर्वेदातून शेतीतील पिके व उत्पादन याविषयी अभ्यास करून आपण शेतीतून उत्पन्न वाढविलेे. सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या उत्पादनाचे स्वतः विपणन केले, मागणीप्रमाणे पिकांचे उत्पादन घेतले. त्यामुळे आपल्याला शेतीतून मोठा आर्थिक फायदा झाला व आपली आर्थिक स्थिती उन्नत झाली असे सदूभाऊ शेळके यांनी यावेळी आपले अनुभव कथन करतांना सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गमे यांनी, युवकांनी चिकाटी, ध्येयनिष्ठा व श्रमप्रतिष्ठा अंगी बाणवणे महत्त्वाचे असून युवकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, वरिष्ठ पर्यवेक्षक अरुण वनारसे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. वैभव सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन गुगल मीटवर हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. गौतम कोलते यांचे तांत्रिक सहाय्य लाभले. प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख मनीषा गायकवाड यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. कैलास बच्छाव यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले, तर आभार प्रा. कविता कानडे यांनी मानले.
----------------
स्वतः पिकवलेला भाजीपाला, धान्य स्वतः पॅकिंग करून विकल्या पाहिजेत. त्यातून अधिक नफा मिळतो. त्यासाठी ट्रेडमार्क, ॲगमार्क आपणास घेता येतो. स्वतःच्या शेतीत राबूनही शेतीपूरक उद्योग आपण उभारू शकतो व उद्योजक बनू शकतो. आपण स्वतः जात्यावरचे पीठ, लाकडी घाण्यावरचे तेल असे अनेक शेतीपूरक उद्योग चालवतो व त्यातून निर्मित उत्पादनांना अनेक चित्रपट कलाकार व सेलिब्रेटिजची पसंती आहे. मागणी आहे, असेही शेळके यांनी सांगितले. पैसे भरून नोकरी करण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसाय युवकांनी करावा. कोणत्याही कामाची, विक्रीची लाज वाटू देऊ नका, असा सल्लाही त्यांनी युवकांना दिला.