मीडिया ट्रायल नको ! छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
By Admin | Updated: February 21, 2015 01:29 IST2015-02-21T01:28:38+5:302015-02-21T01:29:32+5:30
मीडिया ट्रायल नको ! छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

मीडिया ट्रायल नको ! छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नाशिक : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रश्नी माजी खासदार समीर भुजबळ यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी केली असली तरी, अशा चौकशीतून ते सहीसलामत बाहेर पडतील. गेल्या काही काळापासून राजकीय हेतूने प्रेरित होऊन भुजबळ कुटुंबीयांना विविध कारणास्तव ‘टार्गेट’ केले जात आहे. त्यातून साध्य काहीच होत नाही, मात्र मीडियानेही अशा प्रश्नांवर ‘ट्रायल’ घेऊ नये, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी सन २००३ मध्ये तेलगी प्रकरणाचा दाखला दिला. त्यावेळी अशाच प्रकारे तथ्यहीन आरोप करण्यात आले व त्यातून सीबीआयपर्यंत चौकशीला सामोरे जावे लागले. अखेर त्यातून निष्कलंक होऊन भुजबळ कुटुंबीय बाहेर पडले होते. आताही पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती सुरू झाली आहे. विविध पातळीवर सरकार चौकशी करीत असून, अशा चौकशींना सामोरे जाऊ व सत्य काय ते समोर येईल, असेही ते म्हणाले. कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी पोलीस महासंचालकांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा भुजबळ यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, गृहखाते कोणाकडे जरी असले तरी, राज्यकर्ते हे धोरण ठरवित असतात व यंत्रणा त्याची अंमलबजावणी करते. मंत्री असले तरी ते दैनंदिन घडणाऱ्या घटना नियंत्रित करीत नाही, ते काम पोलीस यंत्रणेचे व पोलीस महासंचालकांचे असते त्यामुळे पानसरे यांच्यावरील हल्ल्याबाबत पोलीस महासंचालकांनीच त्याची जबाबदारी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पोलीस महासंचालकांना जाब विचारावा.