जातीचे महत्त्व आम्हाला सांगू नका!
By Admin | Updated: May 11, 2015 04:58 IST2015-05-11T00:48:20+5:302015-05-11T04:58:02+5:30
‘ज्ञानपीठ’विजेत्या भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वाद अद्याप शमण्यास तयार नाहीत. नेमाडे यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये जातिव्यवस्थेचे समर्थन केले होते.

जातीचे महत्त्व आम्हाला सांगू नका!
नाशिक : ‘ज्ञानपीठ’विजेत्या भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वाद अद्याप शमण्यास तयार नाहीत. नेमाडे यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये जातिव्यवस्थेचे समर्थन केले होते. त्यावरून आता मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी नेमाडे यांच्यावर टीका केली आहे. ‘नेमाडे, जातीचे महत्त्व आम्हाला सांगू नका’ अशी तंबी देतानाच नेमाडे हे प्रस्थापितांना विकले गेले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना डॉ. कोत्तापल्ले यांनी सध्याच्या परिवर्तनवादी चळवळीच्या परिस्थितीविषयी सखोल चिंतन केले. त्यात परिवर्तनवाद्यांच्या विरोधात बोलण्यासाठी भांडवलशाही व्यवस्थेकडून विद्वान माणसे विकत घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच नेमाडे यांच्या वक्तव्याचा समाचारही घेतला. ते म्हणाले, ‘मध्यंतरी जातिव्यवस्था महत्त्वाची आहे, आपल्या संस्कृतीचा तो गाभा आहे, प्रत्येकाने आपल्या जातीवर प्रेम करावे, असे काहीतरी नेमाडे बोलले. त्यांना मी कवी दुष्यंतकुमारांच्या शब्दांत एवढेच सांगेल की, ज्या घोड्याच्या तोंडात लगाम लावलेला असतो, तोच लोखंडाची खरी चव सांगू शकतो. नेमाडेंनी आम्हाला जातीचे महत्त्व सांगू नये. जातीने आम्हाला किती होरपळून टाकले आहे, हे त्यांना माहीत नसावे. हा सगळा मी आधी बोलल्याप्रमाणे खरेदी-विक्रीचाच प्रकार आहे.’
भालचंद्र नेमाडे यांनी गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी देशातील पूर्वीच्या तिव्यवस्थेचे समर्थन केले होते. त्यावर पुरोगामी संघटनांकडून विरोधाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. घुमान येथे ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यावरूनही नेमाडे व डॉ. कोत्तापल्ले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.