पोलिसांनो अतिरेक करू नका
By Admin | Updated: August 20, 2015 00:13 IST2015-08-20T00:12:17+5:302015-08-20T00:13:50+5:30
भुजबळ यांनी ओळखली जनतेची नाडी : मुख्यमंत्र्यांसमक्ष गृहखात्याला कानपिचक्या

पोलिसांनो अतिरेक करू नका
नाशिक : आमची संस्कृती ‘अतिथी देवो भव’ची आहे, त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये येणारे भाविक, साधू-महंत हे आपले पाहुणे असल्यासारखेच त्यांच्याशी वर्तन करा, पोलिसांनो थोडा संयम दाखवा, सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावर आहे हे कबूल, पण आपल्या वर्तणुकीने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या, अशा शब्दात आमदार व माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांच्या मनातील भावना व्यक्त करून गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून बंदोबस्ताच्या नावाखाली केल्या जात असलेल्या अतिरेकाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणानिमित्त पोलीस यंत्रणेने मंगळवार सायंकाळपासूनच तपोवनाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करून टाकले होते, त्यामुळे बुधवारी सकाळी आखाड्यांचे ध्वजारोहण व स्वामी रामानंदाचार्य प्रवेशद्वाराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या मान्यवरांनाही पोलिसांच्या अति बंदोबस्ताचा फटका बसला. गेल्या काही दिवसांपासून पोलीस यंत्रणेकडून कुंभमेळा बंदोबस्ताचे कारण दाखवून रस्त्यांची नाकेबंदी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, त्यातून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील होत असून, खुद्द विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वेळोवेळी पोलिसांना सूचना करूनही त्याचा उपयोग झालेला नाही. कुंभमेळा अजून दीड महिना चालणार असून, तो पर्यंत रामकुंड परिसर व तपोवन परिसरातील रहिवाशांना पोलिसांचा जाच सहन करावा लागणार आहे तर याच बंदोबस्तासाठी पर्वणीच्या काळातही शहरवासीयांना ७२ तास पोलिसांच्या नजरकैदेत राहावे लागणार आहे.
नाशिक शहरात बारा वर्षांनी साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी पोलिसांकडून नाशिककरच वेठीस धरले जात असल्याची भावना वेळोवेळी नागरिकांनी व्यक्त करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, खुद्द लोकप्रतिनिधींनीही या विषयावर सोयीस्कर मौन पाळल्यामुळे पोलीस यंत्रणा मोकाट सुटली आहे, अशा परिस्थितीत सामान्य जनता, हातावरचे मजूर, नोकरदार, लहान-सहान दुकानदार यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. जनतेची नाडी ओळखण्यात पटाईत असलेले छगन भुजबळ यांनी नेमक्या जनतेच्या भावनांना हात घालून मुख्यमंत्र्यांसमक्ष त्यांच्या अखत्यारितील गृहखात्याला खडे बोल सुनावताच उपस्थित जनतेने टाळ्यांच्या कडकडाटात आपला सूर त्यात मिसळवला आहे. ‘नाशिक मे आनेवाले मेहमानोंको कुछ तकलीफ न हो’ असे त्यांनी म्हणताच जोरदार टाळ्या पडल्या, ते पुढे म्हणाले, कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला येणारी प्रत्येक व्यक्ती हजार, दोन हजार रुपये खर्च करूनच जाणार आहे, त्याच्या या खर्चाने किमान दहा हजार कोटी रूपयांची उलाढाल नाशिक शहरात होईल, हा पैसा रिक्षाचालक, हॉटेल, लॉजचालक, दुकानदार, व्यावसायिकांंच्याच उपयोगात येण्याबरोबर सरकारलाही हातभार लावण्यास उपयुक्तठरणार आहे असे सांगून येणारा पर्यटक, भाविक हा नाशिककरांसाठी अर्थव्यवस्थेची नवी संधी घेऊन येणार असल्याने या संधीचे सोने करण्याच्या आड पोलिसांनी येऊ नये असा सल्लाही भुजबळ यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)