ईश्वर लादण्याची कोणालाही संधी देऊ नका
By Admin | Updated: January 12, 2017 01:09 IST2017-01-12T01:08:42+5:302017-01-12T01:09:00+5:30
संजय जोशी : वसंत पवार व्याख्यानमालेस प्रारंभ; मान्यवरांची होणार व्याख्याने

ईश्वर लादण्याची कोणालाही संधी देऊ नका
नाशिक : प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचे वास्तव्य असून, आपल्यातील ईश्वराला प्रत्येकाने अनुभव व अभ्यासाच्या जोरावर ओळखणे आवश्यक आहे. कोणालाही आपल्यावर ईश्वराचे विशिष्ट रूप लादण्याची संधी देऊ नका, असे प्रतिपादन लेखक तथा व्याख्याते संजय जोशी यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएटएम महाविद्यालयातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (दि.११) डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना जोशी बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, उपसभापती नाना दळवी, संचालक राहुल ढिकले, नाना महाले, रामराव पाटील, भाऊसाहेब खातळे, आर. डी. शिंदे आदि उपस्थित होते. जोशी म्हणाले, आयुष्यात स्वतंत्र विचार करण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. परंतु, योग्य वयात योग्य पुस्तके वाचकांच्या हाती पडत नसून तसे मार्गदर्शनही मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गीता व ज्ञानेश्वरी यांसारखे ग्रंथ जीवन जगायला शिकवतात. परंतु, नेमके या ग्रंथांचे वाचन आयुष्याच्या उत्तरार्धात करणारे अनेकजण असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आयुष्यात आपल्याला काय मिळवायचे आहे, हे निश्चित करून आपणच त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे मत जोशी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक नीलिमा पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी केले. (प्रतिनिधी)